भूमिपुत्रांचा आमदार बालदींवर आरोप
| पनवेल | प्रतिनिधी |
एकीकडे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या करता स्थानिक भूमीपुत्र आंदोलन करत आहेत. मात्र, त्याचवेळी आगरी कोळी समाजाच्या मतदारांचे प्राबल्य असलेल्या उरण तालुक्यात अमराठी उमेदवार दिल्याने भाजपला स्थानिक समाजातील उमेदवार भेटला नाही का, असा सवाल उपस्थित करत करण्यात आला आहे.
उरण नगरपालिकेतील एकूण 10 प्रभागांतून 21 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्षा असे 22 प्रतिनिधी निवडून देण्यात येणार आहेत. नगराध्यक्ष हे पद महिलांसाठी राखीव झाल्याने नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या पुरुष उमेदवारांमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे. अशातच थेट नगराध्यक्ष पदासाठी महिला उमेदवार म्हणून उरण भाजपा शहर अध्यक्ष कौशिक शहा यांच्या पत्नी शोभा कोळी-शहा यांना उमेदवारी घोषित करण्यात आल्यामुळे स्थानिक भूमीपुत्रांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. आमदारकीच्या निवडणुकीत महेश बालदी यांना उमेदवारी देणाऱ्या भाजपने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत स्थानिक भूमिपुत्राला उमेदवारी देणे अपेक्षित होते. मात्र, पक्षाने स्थानिकांना डिवचण्याचे काम केले असल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
याशिवाय भाजप महायुतीतून निवडणुक लढवणार नसले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोचा वापर भाजपा तर्फे करण्यात आल्याने शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक नेत्यांना विचारात न घेता आ. महेश बालदी नेत्यांच्या फोटोचा वापर करत असल्याचा निषेध शिवसेनेचे स्थानिक नेते अतुल भगत यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शिवसेना नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र उमेदवार देणार असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नगरसेवक पदासाठी स्वतंत्रपणे 16 उमेदवार देणार असल्याची माहिती भगत यांनी दिली. तसेच ही निवडणूक भाजपाविरोधात नसल्याचा उल्लेख करत आ. बादली यांच्या एकाधिकारशाही विरोधात ही निवडणूक लढत असल्याची माहिती भगत यांनी दिली आहे.
काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतून निवडणुकीला सामोरा जात आहे. नगराध्यक्ष म्हणून आमचा भावना घाणेकर यांना पाठिंबा आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मतदान केल्यास खान मुंबईचा महापौर होईल, अशी भीती दाखवायची आणि दुसरीकडे जाणूनबुजून भूमिपुत्रांना डिवचण्याचे काम भाजपा करत असल्याचे चित्र उरणमध्ये पहायला मिळत आहे.
–गुफरान तुंगेकर,
शहर अध्यक्ष काँग्रेस.
स्थानिक भूमिपुत्रांना खिजवण्यासाठीच आ. बालदी यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिला आहे, अशी भावना स्थानिकांमध्ये असून बालदींच्या दावणीला स्थानिकांना बांधण्याचे काम आगरी-कोळी समाजातील काही लोक करत असल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण झाल्याचा फायदा नक्कीच महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना घाणेकर यांच्या पथ्थ्यावर पडेल.
–सत्यवान भगत
तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
भाजपाने कोणाला उमेदवारी द्यावी हा त्या पक्षाचा विषय आहे. मात्र जर सहकारी पक्षांना सोबत घ्यायचं नसेल तर आमच्या पक्षाच्या नेत्यांचे फोटो वापरू नयेत, असे आमचं मत आहे. तसेच येत्या काही दिवसात उमेदवार जाहीर करणार असून सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेशी युतीबाबत चर्चा सुरु आहे.
–परीक्षित ठाकूर,
तालुका अध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( अजित पवार गट )
स्थानिक भूमीपुत्रांना डावलून आमदार महेश बालदी एक प्रकारे स्थानिकांच्या मताला आपण किंमत देत नसल्याचे दाखवत आहेत. त्यांनी हे यापूर्वी देखील दाखवून दिले आहे. आणि ते आतादेखील तसे सिद्ध करत आहेत.
–गणेश शिंदे नेते
(शिवसेना उबाठा)
या विषयी बोलण्यासाठी भाजपा उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता ते बोलण्यासाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.







