। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग आणण्याचा मनोदय उद्योेगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारीच अलिबाग येथे केला असताना, शिंदे-फडणवीस सरकारमधील सर्वात मोठ्या असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या माजी जिल्हाध्यक्षांनी बल्क ड्रग्ज पार्कविरोधात काढलेला मोर्चा भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे. बल्क ड्रग्ज आणि शेतकर्यांचा विरोध अशा दुहेरी कात्रीत भाजप सापडली आहे. दरम्यान, मंगळवारी संभाव्य प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आपला विरोध दर्शविला.
जिल्ह्यातील रोहा-मुरूड तालुक्यातील प्रस्तावित बल्क ड्रग्ज प्रकल्पाबाबत संभ्रमाचे वातावरण असतानाच मंगळवारी येथील संभाव्य प्रकल्पग्रस्त शेतकर्यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या प्रकल्पाला जमिनी देणार नाही, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शेतकर्यांचा विरोध असताना मूठभर लोकांच्या फायद्यासाठी जर कुणी प्रकल्प आणू पाहात असेल, तर त्याला शेतकर्यांचा विरोध कायम राहील. तो विरोध प्रकट करण्यासाठी हा मोर्चा आहे, असे या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अॅड. महेश मोहिते यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात शेतकरी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
24 जणांवर गुन्हा दाखल
शेतकर्यांच्या मोर्चाप्रसंगी कायदे नियमांचा भंग केल्याच्या आरोपाखाली आयोजकांसह 24 जणांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. भारतीय दंड विधान कलम 143, 149, 341 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1)(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.