भाजप मोदींचा नव्हे, राणेंचा पक्ष; खा. विनायक राऊत यांचा टोला

विकास कामांच्या भूमिकांवरुन राणे भाजपवर टीकास्त्र
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।

भाजप हा पक्ष मोदींच्या नेतृत्त्वाखाली पक्ष आहे असा गैरसमज आहे. पण खरे पाहता भाजप हा पक्ष मोदींचा राहिला नसून, तो आता राणेंचा पक्ष झाला आहे. यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव अटळ असल्याचा टोला खा.विनायक राऊत यांनी राणे कुटुंबीय आणि भाजपला लगावला आहे.
याशिवाय जिल्ह्यातील विकास कामांच्या भूमिकांवरुन, केवळ श्रेयवादापोटी अन्य पक्षांना किंवा राज्यशासनाला या भागात काम करु न देण्याचा आरोप करत भाजपवर टीकास्त्र डागले आहे. कुडाळ एसटी स्टँड मैदानावर आयोजित कुडाळ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रचारार्थ शिवसेना-राष्ट्रवादी पक्षाच्या जाहीर सभेत खा.राऊत बोलत होते.
आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ऐन थंडीत जिल्ह्याचे राजकीय तापमानप दिवसागणिक वाढत आहे. एकेकाळी परस्पर सख्यत्व जपणारे मित्रपक्ष परपरस्परांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. अर्थातच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकानंतर समोर आलेले चित्र आता राज्यासाठीच नाही तर देशासाठीही नवीन राहिलेले नाही. पण यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधक अशा भूमिकेत परस्परांसमोर उभे राहिलेले पक्ष ठेवणीतले ते सारे चव्हाट्यावर मांडत गल्ली ते दिल्ली दरम्यान सर्वच सत्तासंपादनासाठी झगडताना दिसत आहेत.
यातच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जवळ आल्या असून, सिंधुदुर्ग परिसरातील सर्व स्तरीय निवडणुका राणे कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेचा विषय बनत आहेत. तर कोणत्याही परिस्थितीत आपलेच निशाण येथे फडकले पाहिजे, या अट्टाहासाने महाविकास आघाडीत समाविष्ट पक्ष राजकीय डावपेचांच्या आधारे झुंज देत आहेत.
यापैकी एक निवडणुक म्हणजे कुडाळ नगरपंचायत निवडणुक. शिवसेना आणि भाजप यातच राणे कुटुंबासाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची बनली असून, यासाठी उभयपक्ष परपस्परांना पाण्यात दाखविण्याची एकही संधी सोडायला तयार नाहीत. आणि म्हणूनच कुडाळ नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रचारार्थ शिवसेना-राष्ट्रवादी पक्षाच्या जाहीर सभेत भाजप, विशेषतः राणेंना लक्ष्य करुन जनतेला योग्य उमेदवार निवडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खा. राऊत म्हणाले की, सतीश सावंत यांनी बँक वाचवली. पैसे असून खर्च करणारी न नगरपंचायत, कर्मदरीद्री ठरली आहे. खायचे फक्त यांना समजते. विमानतळाचे काम आम्ही पूर्ण केले. शासकीय महाविद्यालय झाले तर खासगी महाविद्यालय कसे चालणार? यासाठी राणेंचा विरोध, का नाही त्यांनी याबाबत प्रयत्न केले. कुडाळ विकासापासुन दूर नेण्याचे काम केले असल्याचे आरोप त्यांनी केले.
तर विकासाबाबत आश्‍वासन देता आता कुडाळ बदलायचा आहे, असे प्रतिपादन करत, ओबीसी आरक्षणाबाबत केंद्रावर टीका केली आहे. केंद्र सरकारला राज्यातील ओबीसीनां न्याय द्यायचा नाही. आम्ही चारही जागावर ओबीसीनाच उमेदवारी देणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री सामंत, शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, आ. वैभव नाईक, माजी पालकमंत्री दीपक केसरकर, माजी महापौर विश्‍वनाथ म्हाडेश्‍वर, मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, अवधूत मालणकर, मंदार केणी आदी पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version