खासदार तटकरेंनी खरे रंग दाखवल्याने भाजपा नाराज; ‘लाडकी बहीण’ कार्यक्रमाकडे लाडक्या भावा-बहिणींची पाठ
| रायगड | खास प्रतिनिधी |
रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांना निवडून आणण्यासाठी भाजपाने जीवाचे रान केले होते. महायुतीमधील घटक पक्षातील सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा शब्द निवडणुकीपूर्वी खासदार तटकरे यांनी दिलेला शब्द आता ते विसरले आहेत. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे राजकीय खच्चीकरण करण्याचा उद्योग त्यांच्याकडून सुरु आहे. त्याला विरोध म्हणून ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ वचनपूर्ती सत्कार सोहळा कार्यक्रमात भाजपाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती भाजपाचे रोहा तालुकाध्यक्ष अमित घाग यांनी ‘कृषीवल’शी बोलताना दिली.
भाजपाच्या पदाधिकार्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीमधील खदखद समोर आली असून, यापुढे त्यामध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. निवडून येण्यासाठी आमच्या नेत्यांचे उंबरठे खासदार सुनील तटकरे यांनी झिजवले होते. त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडूनदेखील आणले होते. त्यामध्ये सर्वाधिक वाटा हा पेण विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित भाजपा खासदार धैर्यशील पाटील यांचा आहे. त्याच धैर्यशील पाटील यांचे फोटो, त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेतून तसचे महायुतीच्या विविध बॅनरवरुन काढून टाकण्यात येत आहे. यासाठी खासदार तटकरे हे सरकारी अधिकार्यांवर दबाव टाकत आहे. ‘गरज सरो आणि वैद्य मरो’ अशी खासदार तटकरेंची खासीयत राजकारणात पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता आगामी विधानसभेच्या निवडणुकीत श्रीवर्धन मतदारसंघात तटकरे यांच्या कोणत्याही उमेदवाराचे काम करणार नाही. ‘बायकॉट श्रीवर्धन’ अशी मोहीम राबवणार असल्याचे घाग यांनी स्पष्ट करुन तटकरे यांच्या विरोधात मोर्चा खोलला आहे.
माणगाव येथे होणारा कार्यक्रम हा आमच्याच सरकारचा आहे. आमचा त्या कार्यक्रमावर अजिबात आक्षेप नाही. मात्र, खासदार तटकरे यांनी मतदारसंघात जे काही कुरघोडीचे राजकारण सुरु केले आहे, त्याला आमचा प्रखर विरोध आहे. आमच्या नेत्यानांही याची जाणीव झाली पाहिजे, यासाठी माणगावच्या कार्यक्रमाला भाजपाची कोणतीही महिला जाणार नाही, असे घाग यांनी सांगितले.
खासदार धैर्यशील पाटील हे खासदार झाल्यापासून खासदार तटकरे यांना राजकीय असुरक्षितता वाटत आहे. त्यांच्या आजवरच्या राजकीय वाटचालीत त्यांनी भल्याभल्यांना वाटेला लावले आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर फक्त आणि फक्त आपलेच वर्चस्व राहावे, दुसरा कोणी प्रतिस्पर्धी नको, अशी त्यांची भूमिका राहिली असल्याचेही घाग यांनी सांगितले. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष केले तर, त्याचा उद्रेक होईल, असा इशाराही त्यांनी दिला. जिल्ह्याच्या विविध भागातून मला याबाबत विचारणा होत आहे. कार्यक्रमला अजिबात जाऊ नका, अशा सूचना देण्यात येत असल्याकडेही घाग यांनी लक्ष वेधले.