पुन्हा एकदा सिंचन फाईल चर्चेत;चणेरातील म्हसाडी धरणाचे काय

। रोहा । जितेंद्र जोशी ।
भाजप नेते मोहित कंबोज यांनी राज्यातील सिंचन घोटाळ्यावरून केलेल्या ट्विटमुळे पुन्हा एकदा राज्यातील सिंचन फाईल चर्चेत आली आहे. 13 ऑक्टोबर 2011 रोजी विविध प्रकारच्या आवश्यक मंजुर्‍या नसतानाही तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांनी म्हसाडी धरणाच्या भूमीपूजनाचा नारळ फोडला होता. या गोष्टीला आता 11 वर्ष पूर्ण होत आहेत; पण म्हसाडी धरणाच्या कामात एक दगड देखील अद्याप लागला नसल्याने चणेरा विभागातील नागरिक म्हसाडी धरण केव्हा होणार, असा सवाल उपस्थित करत आहेत.

निवडणुका आल्या की, कधी धरणाचा विषय तर कधी नवनगर उभारणी तर कधी फार्मा बल्क ड्रग पार्क अशी जनतेला स्वप्ने दाखवायची. निवडणुका झाल्या की, सारे काही विसरून जायचे, अशी रोह्यातील लोकप्रतिनिधींची काम करण्याची पद्धत झाली आहे. सामान्य जनतेच्या प्रश्‍नांपेक्षा स्वतःचे हित कसे होईल, याची चिंता असणार्‍या लोकप्रतिनिधींना जनता म्हसाडी धरणाचे काय झाले, असा सवाल विचारत आहे.

मागील अडीच वर्षे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवाय एकाच घरात खासदारकी व आमदारकी तसेच सात आठ खात्यांची राज्यमंत्री पदे असूनही म्हसाडी धरणाच्या बाबत ब्र शब्द देखील कोणी काढला नाही. म्हसाडी धरण झाल्यास या भागातील जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच शेती सिंचनाचा प्रश्‍न मार्गी लागला असता.पण जनतेच्या प्रश्‍नांपेक्षा औद्योगिक कंपन्या आणून बगलबचांच्या नावे खरेदी केलेल्या जागा विकून बक्कळ नफा कमावण्याचा हेतू साध्य होत नसल्याने म्हसाडी धरणाच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. त्यामुळे आता सिंचन घोटाळ्यातील कोणता बडा नेता जेलमध्ये जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version