कर्जत पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
| नेरळ | प्रतिनिधी |
माझी पत्नी डेप्युटी कलेक्टर असून, तिच्या एका इशाऱ्यावर पोलीस तुम्हाला आत टाकून चोप देतील, असे खांडपे येथील फार्म हाऊस मालक यांच्याकडून आदिवासी कातकरी समाजाच्या लोकांना धमकावले जात आहे. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या प्रकाराबद्दल कर्जत पोलीस ठाण्यात आदिवासी बांधवाने तक्रार दाखल केली होती. दरम्यान, त्याच्या तक्रारीवरून कर्जत पोलिसांनी ॲट्रॉसिटी ॲक्टखाली गुन्हा दाखल केला आहे. सदर फार्म हाऊस मालक हे भाजपचे पदाधिकारी आहेत.
कर्जत तालुक्यातील सांगवी कातकरी वाडीमधील आदिवासी कृष्णा तुलाजी पवार हे गेली 20 वर्षे खांडपे गावातील परशुराम घारे यांच्या शेतात मजूर म्हणून काम करतात. कृष्णा पवार हे दिवसभर घारे यांच्या शेतातील कामे उरकून सायंकाळी सांगवी येथील घरी जातात. त्यांचा हा नेहमीचा दिनक्रम आहे. परशुराम घारे यांचे खांडपे गावाच्या हद्दीत असलेल्या शेतीच्या बाजूला पनवेल येथील अशोक गायकर यांची शेतजमीन आहे. तेथे गायकर यांच फार्म हाऊस असून, त्यांच्याकडून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आपल्याकडील बंदुकीचा धाक दाखवून दहशत पसरवली जात असल्याची तक्रार कृष्णा पवार यांनी केली आहे.
8 डिसेंबर 2022 रोजी पवार हे तेथील शेतात डंपर आणि ट्रॅक्टरसह त्यांचे चालक आणि मजूर असे नऊ मजूर काम करीत असताना मातीने भरलेला डंपर अशोक गायकर यांनी अडविला. त्यावेळी गायकर यांनी आपल्याकडील रिव्हॉल्व्हर रोखून कृष्णा पवार हे आदिवासी कातकरी समाजाचे असल्याचे माहिती असूनदेखील त्यांना जातीवाचक शिव्या देते, एक एकाला गोळ्या घालतो असे धमकावत जीव ठार मारण्याची धमकी दिली. त्यावेळी पवार यांची पत्नी कुसुम या धावत आल्या आणि त्यांनी दोन्ही गाड्यांचे चालक आणि पवार यांना बाजूला नेले. घडलेला प्रकार कृष्णा पवार यांनी त्यांचे व्यवस्थापक गणेश देशमुख यांच्या कानावर घातला असता सर्व कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचले. त्यावेळी शेतजमिनीचे मालक परशुराम घारे यांचे पुत्र सुधाकर घारे हेदेखील पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथे फार्म हाऊस मालक अशोक गायकर यांनी तुम्ही तक्रार दाखल करू नका, अशी विनंती केल्याने सुधाकर घारे यांनी मध्यस्थी करून सदर जातीवाचक शिवीगाळ आणि ठार मारण्याची धमकी देण्याचे प्रकरण कर्जत पोलीस ठाणे येथे मिटवले.
मात्र, तरीदेखील काही दिवसांनी पुन्हा अशोक गायकर यांनी आपल्या कुरापती सुरूच ठेवल्याने अखेर आदिवासी मजूर कृष्णा पवार यांनी कर्जत पोलीस ठाणे येथे 15 मे रोजी गेली काही महिने होत असलेल्या प्रकारची माहिती देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कृष्णा पवार यांनी आपल्या तक्रारीत अशोक गायकर हे सतत आपल्याकडील रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून शेताकडे जाऊ देत नाहीत. त्याचवेळी गायकर यांच्या फार्म हाऊसचे कुंपण आहे, त्याला वीज वाहक तारांना वीज जोडणी करून ठेवली आणि त्यामुळे तेथे शेतकऱ्यांना विजेचा शॉक लागण्याची शक्यता आहे. त्याचवेळी फार्म हाऊस बाहेर येऊन आजूबाजूच्या शेतकऱ्यांना आणि परशुराम घारे यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना माझी बायको डेप्युटी कलेक्टर आहे, तिला सांगून तुम्हाला पोलीस ठाण्यात नेऊन चांगला चोप द्यायला लावू शकतो, अशा धमक्या गायकर हे सातत्याने देत असतात. त्यामुळे कृष्णा पवार यांनी अशोक गायकर यांच्याविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गायकर यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
कोण आहेत अशोक गायकर?
अशोक गायकर यांच्या पत्नी या उपजिल्हाधिकारी असून, अशोक गायकर हे भाजप किसान मोर्चाचे रायगड जिल्हा माजी अध्यक्ष म्हणून काम करीत होते. आता ते भाजप किसान मोर्चा कोकण प्रदेश अध्यक्ष आहेत. तर, गायकर यांनी 2016 मध्ये रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून लढली होती.