| उरण | विशेष प्रतिनिधी |
उरण रेल्वे स्थानकातून घरी जात असताना शनिवारी रात्री साडेअकरा वाजता एका दाम्पत्याला क्रेटा कारने धडक दिली. यामध्ये पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या चार वर्षांच्या मुलीवर उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक आहे. वाहनचालक जय चंद्रहास घरत याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपी फरार असून त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी जनवादी संघटनेने केली आहे. आरोपी जय घरत हा भाजप आमदार महेश बालदी यांचे निकटवर्तीय आणि भाजप नेते चंद्रहास घरत यांचा मुलगा आहे. अपघात झाल्यावर तिथे हजर असलेल्या सीआरपीएफच्या जवानाला मारहाण करून त्याने पळ काढला, असा आरोप करण्यात आला आहे.
या अपघातात पवित्र बराल (40), रश्मिता बराल (37) या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची चार वर्षांची चिमुकली या अपघातात जखमी असून या मुलीवर उरण येथील प्राथमिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती मृत्यूशी अद्याप झुंज देत आहे. या घटनेबाबत उरणच्या नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. चालक जय घरत यााने या घटनाप्रसंगी दबावतंत्र वापरून तेथील अतुल चव्हाण या सीआरपीएफ जवानाला देखील मारहाण करुन तेथून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. या संपुर्ण प्रकारचे पडसाद आता उरण परीसरात उमटू लागल्याने महिला संतप्त झाल्या आहेत.