वानखेडे स्टेडियमवर फायनल का नव्हती; संजय राऊतांचा बोचरा सवाल
। मुंबई । वृत्तसंस्था ।
भारतीय संघ हरला ते दुःख सर्वांना झाले आहे. या देशांमध्ये खिलाडूवृत्ती आहे आणि खेळांमध्ये हारजीत होत असते. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारताचा पराभव झाला आहे. अंतिम सामने दिल्लीत होतात किंवा मुंबईतील वानखेडे मैदानात होतात. मला क्रिकेटमधलं फारसं कळत नाही. पण वानखेडेवर अंतिम सामना झाला असता तर हा सामना आपण जिंकलो असतो, असं जाणकार सांगतात. मात्र, यावेळेला क्रिकेटमध्ये राजकीय लॉबी घुसली. त्यांनी वल्लभाई पटेल स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम ठेवले. भाजप सर्व श्रेय आपल्याकडे घेण्याचा विचार करत होता, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने सर्व बाद 240 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताचं हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 4 फलंदाजांच्या मोबदल्यात सहज पार केलं. विश्वचषकाची फायनल गुजरातच्या अहमदाबादमध्ये खेळवण्यात आली. या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते.
संजय राऊतांचा हल्लाबोल हा सामना म्हणजे भारत विरुध्द ऑस्ट्रेलियानसून भाजप विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा होता. जिंकला तर भारतीय जनता पक्ष , पण आता हरलात ना? भारत संघ उत्तम खेळला, हरले असले तरी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. दुःखात आपण देखील सामील झाले पाहिजे. ही संघावर व्यक्तिगत टीका टीपण्णी करत नाही. वर्ल्ड कप जिंकला असता तर देशाला आनंद झाला असता .मात्र, ज्या पद्धतीने राजकारण निकालानंतरची व्यवस्था करण्यात आली होती, भारतीय जनता पक्ष दुर्दैवाने पाणी त्याच्यावरती फिरले, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.
कपिल देवच्या संघाला निमंत्रण का नव्हतं? सर्वप्रथम देशाला विश्वचषक मिळून देणाऱ्या कपिल देव आणि त्याच्या संघाला आमंत्रित केलं नाही. कपिल देवच तिथे आगमन झालं असतं इतर राजकीय नेत्यांच्या प्रसिद्धीला ग्रहण लागलं असतं याला म्हणतात राजकारण, असं संजय राऊत म्हणाले. पडद्या मागचे राजकारण काल झालं. भविष्यात त्याची नक्कीच चर्चा होणार, असा हल्लाबोल राऊतांनी केला.
क्रिकेटची पंढरी मुंबई. मुंबईतून सर्वच उद्योग घेऊन जायचं. पैसा घेऊन जायचं. कॉर्पोरेट कंपन्या घेऊन जायचे आणि क्रिकेटदेखील घेऊन जायचं, असं घणाघात राऊतांनी केला.