तटकरेंना भाजप निष्ठावंतांचा विरोध

पदाधिकार्‍यांनी दिला राजीनामा

। पेण । प्रतिनिधी ।

हमरापूर विभागामध्ये दोन दिवसापूर्वी खा. सुनील तटकरे यांच्या सभेचे आयोजन केले होते. या सभेला आघाडी धर्म न पाळता भाजपच्या कार्यकर्त्यांना व पुढार्‍यांना राष्ट्रवादीकडून आमंत्रण देण्यात आले नाही. तसेच खा. सुनील तटकरे यांनी गेल्या पाच वर्षातील पेण तालुक्यातील विकासकामांना दिलेली दुजाभाव वागणूकीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना सुनील तटकरे यांची उमेदवारी मान्य नसल्याचा सूर पेण तालुक्यात उमटत आहे. सुनिल तटकरे यांची उमेदवारी मान्य नसल्याने हमरापूर विभागातील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते तथा भाजप किसान मोर्चा उपाध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, ग्रामपंचायत जोहेचे सदस्य काशिनाथ पाटील यांनी पक्षातील पदाचा राजीनामा देत असून कोणत्याही परिस्थितीत सुनील तटकरे यांचे काम करायचे नसल्याचे कृषीवलशी बोलताना सांगितले.

यापुढे काशिनाथ पाटील यांनी सांगितले की, पक्ष जर भ्रष्टाचारी माणसांना आमच्या मानगुटीवर बसवत असेल तर आम्ही ते मान्य करणार नाही. तटकरेंना निवडून देणे म्हणजे पुन्हा एकदा भ्रष्टाचाराला मदत करण्यासारखे आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय पक्षश्रेष्ठींना लखलाभ असो. तटकरेंचे काम करायला मला मान्य नाही. म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version