शिंदे गटाचा पराभव करीत भाजपचा नगराध्यक्ष
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
संपूर्ण राज्यासह रायगड जिल्ह्यात भाजप-शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची महायुती आहे. परंतु, पाली नगरपंचायतीच्या नगराध्यपदाच्या निवडणुकीत महायुतीत फूट पडल्याचे दिसून आले. नगराध्यक्षपदासाठी महायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या भाजप आणि शिंदे गटाने एकमेकांना आव्हान देत ही निवडणूक लढवली. बुधवारी (दि. 10) चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत निवडणूक बुधवारी (दि. 10) पार पडली. भाजपचे उमेदवार पराग विजय मेहता यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) कल्याणी दबके यांचा पराभव करीत नगराध्यक्षपदावर नाव कोरले. या विजयामुळे महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र असून, रायगडात महायुतीत ठिणगी पडल्याची जोरदार चर्चा आहे.
नगराध्यक्षपदासाठी सुरुवातीला तिरंगी लढत होणार होती. शिवसेनेच्या कल्याणी संदीप दपके, राष्ट्रवादीच्या नलिनी म्हात्रे व भाजपचे पराग मेहता अशी ही समीकरणे होती. मात्र, निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका नलिनी म्हात्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि भाजपच्या पराग मेहता यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे भाजपचा विजय निश्चित मानला जात होता. तरीसुद्धा मागील दोन दिवसांपासून ‘घोडेबाजार’ सुरू असल्याच्या चर्चेमुळे वातावरण तापले होते. काही नगरसेवक फुटण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. शेवटच्या क्षणापर्यंत कधी शिवसेनेचे पारडे जड, तर कधी भाजपचे पारडे जड असल्याच्या चर्चांनी रंग भरला होता. मात्र, आज झालेल्या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादी आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. पराग मेहता यांना 9 मते, तर कल्याणी दपके यांना 6 मते मिळाली.
पराग मेहता विजयी झाल्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण, ढोल-ताश्यांच्या गजरात “पराग मेहता नगराध्यक्ष झाल्याच्या” घोषणा देत कार्यकर्त्यांनी वातावरण दणाणून सोडले. दरम्यान, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेचा पराभव झाल्याने तोंडघशी पडल्यासारखे झाले होते.
पराग मेहता यांच्या विजयाने भाजप व राष्ट्रवादीच्या युतीला मोठा राजकीय टप्पा गाठता आला असून, पाली नगरपंचायतीतील आगामी राजकारणाची दिशा यानंतर ठरणार आहे. परंतु, राजकारण्यांच्या घाणेरड्या राजकारणामुळे पालीच्या विकासावर त्याचा परिणाम होणार असल्याचे मत सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
