भाजपच्या सदस्यांची ठरावांना नामंजूरी; पुनरिक्षण सर्वसाधारण सभा निरर्थक
| चिरनेर | प्रतिनिधी |
कोकण विभागीय आयुक्तांच्या आदेशाने पुनरिक्षणासाठी उरण नगरपरिषदेने मंगळवारी (दि.14) सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. परंतु, या सभेत बहुमतात असलेल्या भाजपच्या 12 सदस्यांनी महाविकास आघाडी विरोधात भूमिका घेत 38 ठरावांवर नामंजूरीची मोहर उमटवली. त्यामुळे शहराच्या विविध विकास कामांसाठी आयोजित सभा पुन्हा एकदा निरर्थकच ठरली.
उरण नगरपरिषदेने दि.18 मे रोजी सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या सभेत विविध विकास कामांचे 44 विषय कार्यक्रमपत्रिकेवर ठेवण्यात आले होते. परंतु, सभेचे कामकाज सुरू असतानाच 7 ठरावांनंतर सत्ताधारी महाविकास आघाडी विरोधात भाजपच्या 12 सदस्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि वादविवादाने आणखीनच गंभीर स्वरूपाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी विरोधकांतील दोन सदस्यांना सभागृहाबाहेर जाण्याचे फर्मान सोडले होते. मात्र, नगराध्यक्षांच्या आदेशाचे विरोधी सदस्यांनी पालन केले नाही. त्यावेळी सभागृहातील विरोधकांची उपस्थिती डावलून सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी 9 सदस्यांच्या जोरावर विकास कामांचे 44 ठराव मंजूर केले होते. परंतु, त्याला भाजपच्या सदस्यांनी विरोध करून रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून दाद मागितली होती. मात्र, याबाबत अधिकार नसल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे पाठविण्याची सूचना केली होती. त्यानुसार भाजपच्या सदस्यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती, अशी माहिती उरण नगरपरिषद कार्यालयाकडून देण्यात आली.
कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानंतर पुनरिक्षणासाठी मंगळवारी (दि.14) उरण नगरपरिषदेने नगराध्यक्षा भावना घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली होती. मात्र, कोकण विभागीय आयुक्तांच्या आदेशाने बोलाविण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेतही भाजपच्या 12 सदस्यांनी 38 ठराव बहुमताच्या जोरावर नामंजूर केले. विरोधकांनी विरोधाची परंपरा कायम राखल्याने शहराच्या विविध विकास कामांसाठी आयोजित सर्व साधारणसभा पुन्हा एकदा निरर्थक ठरली.
विभागीय कोकण आयुक्तांनी महिलांचे विविध प्रश्न व स्वच्छता, आरोग्य, स्वच्छतागृहासारख्या विषय नाकारु नयेत, अशा सूचना केल्या होत्या. मात्र, त्यानंतरही भाजप सदस्यांनी हे विषय नामंजूर केले.
– भावना घाणेकर, नगराध्यक्षा, उरण नगरपरिषद
