| मुंबई | वार्ताहर |
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांची आज ही दुसरी दिल्लीवारी आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेसुद्धा सध्या दिल्लीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांची सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत मनसे-भाजप युतीबाबत अंतिम निर्णय होण्याची चिन्हं आहेत. मागच्या काही दिवसांपासून भाजप आणि मनसे युती होईल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या, पण दोन्ही पक्षांकडून या चर्चा ना फेटाळल्या जात होत्या, ना स्वीकारल्या जात होत्या. आता राज ठाकरे दिल्लीत गेल्याची माहिती समोर आली आहे.