| मुंबई | वृत्तसंस्था |
मुंबई इलेक्ट्रीक वर्कर्स युनियन’चा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम बुधवारी षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तेव्हा आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी बंडखोर शिंदे गट आणि भाजपवर तुफान हल्ला चढवला.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपमधील राजकीय संघर्ष तीव्र होत आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणवून घेणाऱ्या भाजपकडून दुसऱ्या पक्षांचे आमदार, खासदार, नेते चोरण्याचा कार्यक्रम सुरू आहे. हा राष्ट्रीय पक्ष आहे की चोरबाजार? असा बोचरा सवाल करत भाजपवर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आचारविचार काहीही नसलेल्या भाजपला सत्तापिपासूप्रमाणे मुंबई मिळवण्याची हाव लागली आहे. मात्र, मराठी माणूस ती कदापीही पूर्ण होऊ देणार नसल्याचा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच राज्यात सध्या दोन चाकी ‘ईडी’ सरकार आले असल्याची टीका त्यांनी केली.
सध्याचे मुख्यमंत्रीच कंत्राटी
राज्यातील कंत्राटी वीज कामगारांच्या प्रश्नाचा संदर्भ घेत उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, कंत्राटी कामगारांप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्रीदेखील कंत्राटी आहेत. त्या पदावर किती वेळ राहणार हे त्यांनाच माहीत नाही असा टोलाही लगावला.