लखनऊ | वृत्तसंस्था |
विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच उत्तर प्रदेशात फोडोफोडीचं राजकारण सुरू झालं आहे. भाजपचे तीन आमदार आणि एक दोन कॅबिनेट मंत्री फुटल्यानंतर आता भाजपनेही समाजवादी पार्टी आणि काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. समाजवादी पार्टीचा विद्यामान आणि एक माजी आमदार तसंच काँग्रेसच्या एका विद्यमान आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य आणि मंत्री दारा सिंह चौहान यांनी पदाचा राजीनामा दिला. यासह आणखी तीन भाजप आमदारांनी राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर भाजपनेही तीन आमदारांना पक्षात प्रवेश करत आज काँग्रेस आणि समाजवादी पार्टीला जोरदार झटका दिला आहे.
सहारनपूर जिल्ह्यातील बेहाट येथील काँग्रेसचे आमदार नरेश सैनी, फिरोजाबादमधील सिरसागंज मतदारसंघातील समाजवादी पार्टीचे आमदार हरिओम यादव आणि समाजवादी पार्टीचेच माजी आमदार धरमपाल यादव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत तिन्ही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.