झिराड नाक्यावर सकाळी तुफान राडा; दिलीप भोईर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
| रायगड | प्रतिनिधी |
झिराडमध्ये सुरु असलेल्या जवळपास 550 कोटी रुपयांच्या खासगी कामांवरुन गेले काही दिवस भाजप व शिंदे गटात धुसफूस सुरु होती. झिराडमधील जवळपास सर्वच कामे भाजप कार्यकर्त्यांच्या घशात गेल्याने शिंदे गट समर्थक चांगलेच भडकले होते. याबाबत शिंदे गट समर्थक भाजप कार्यकर्त्यांना सतत विचारणा करीत होते. हाच राग मनात धरुन बुधवारी (दि. 10) सकाळी साडेआठच्या सुमारास भाजप समर्थकांनी शिंदे समर्थकाला भर चौकात चांगलाच चोप दिला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
याप्रकरणी झिराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून भाजपचे पदाधिकारी दिलीप भोईर व त्यांच्या मुलाच्या सांगण्यावरुनच भाजप समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सध्या मारहाण करणारे आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दिलीप भोईर यांची हुकूमशाही सुरु असून त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा, यासाठी शिंदे समर्थकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे.