| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |
कळंबोली शहराच्या राजकारणात महत्त्वाची उलथापालथ झाली असून, भाजपामधील शेकडो महिलांनी माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आहे.
भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक बबन मुकादम यांच्या खांद्याला खांदा लावून सच्च्या व निडर कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या गौरी कोरडे व यशोदा आलदर यांच्यासह जवळपास 500 महिला कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश कळंबोलीतील राजकीय समीकरणांना कलाटणी देणारा ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
हा प्रवेश सोहळा गुरुवारी (दि.25) कळंबोली येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी यशोदा आलदर यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी शेकापमध्ये प्रवेश केल्याने पक्षाच्या महिला संघटनाला मोठे बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले.
या पक्षप्रवेशामुळे आगामी काळात शेतकरी कामगार पक्षाला निश्चितच मोठा फायदा होणार असून कळंबोलीतील राजकारणात नवे समीकरण आकारास येईल, असा विश्वास गोपाळ भगत यांनी व्यक्त केला. महिला शक्तीच्या या प्रवेशामुळे शेकापची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाल्याचे स्पष्ट होत आहे. आतापर्यंत अनेक वर्ष मी भाजपसाठी निष्ठेने काम केले. मात्र, कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारे विचारात न घेता आपला फक्त वापर करून घेतला जात असल्याची भावना यावेळी गौरी कोरडे यांनी व्यक्त केली.







