। नांदेड । प्रतिनिधी ।
राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्यपदांसाठी शनिवारी (दि.20) मतदान प्रक्रिया सकाळी 7.30 वाजल्यापासून सुरु झाली आहे. याचदरम्यान, नांदेडमधील धर्माबाद येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धर्माबादमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी मतदारांना डांबून ठेवले, असा आरोप मतदारांकडूनच करण्यात येत आहे. शहरातील बन्नाळी भागातील एका मंगल कार्यालय येथे भाजप उमेदवार व कार्यकर्त्याकडून मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयत्न झाला. यासाठी शंभर ते दीडशे मतदार मंगल कार्यालयात आणण्यात आले. पैसे वाटताना गोंधळ झाल्याने मतदारांनी आम्हाला कोंडून ठेवल्याचा आरोप केला असून पोलिसांनी कोंडून ठेवलेल्या मतदारांना बाहेर काढले असल्याची माहिती मिळत आहे.







