। मुंबई । प्रतिनिधी ।
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भरसंसदेत घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल हिणकस वक्तव्य करून त्यांचा अपमान केला आहे. त्याबद्दल अमित शहा यांच्यावर तातडीने कारवाई करा, नाहीतर सत्ता सोडा, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. महाराष्ट्रात महायुतीला राक्षसी बहुमत मिळालेले आहे. त्यामुळे महाराष्ट्राला कसेही वाकवा, कसेही झोडा, महाराष्ट्राच्या दैवताचा कुणीही अपमान करा, महाराष्ट्र काहीच करू शकत नाही, अशा मस्तीत भाजप वागायला लागला आहे. ही मस्ती मोडण्याची आता वेळ आली आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले आहे.
आंबेडकर ही तर आता फॅशनच झाली आहे, त्यापेक्षा देवाचे नाव घेतलात तर सात जन्म स्वर्गप्राप्ती होईल, असे अवमानकारक वक्तव्य अमित शहा यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केले होते. त्यानंतर देशभरात शहा आणि भाजपविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. अमित शहा यांचा तीव्र निषेध केला जात आहे. उद्धव ठाकरे यांनीही ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना अमित शहा आणि त्यांची पाठराखण करणार्या भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, भाजपा आणि संघानेही आता खुलासा केला पाहिजे की त्यांनी हे अमित शहांकडून बोलवून घेतलेय का? अदानींचे नाव घेतल्यानंतर आभाळ कोसळावे तसा भाजपा विरोधकांवर कोसळून पडतो. आता बाबासाहेबांचा उल्लेख असा केल्यानंतर भाजपा अमित शहांवर काही कारवाई करणार आहे का? नसेल तर भाजपच्या हृदयामधील काळे आता उघड झाले आहे, असे म्हणत, आतातरी महाराष्ट्र आणि देशाने शहाणे झाले पाहिजे, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
भाजपाचे ढोंग जनतेसमोर आले
अमित शहा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांचा अत्यंत हिणकस व उद्दाम उल्लेख अमित शहा यांनी केला आहे. हा उद्दामपणा आहे. भाजपाचा बुरखा फाटून त्यांचे ढोंग आता समोर आले आहे. भाजपाचे हिंदुत्व म्हणजे ‘मुंह में राम आणि बगल में छुरी’ असे आहे. त्यांना महाराष्ट्र संपवायचा आहे. आपल्यापूर्वी जन्माला कुणी आलेच नाहीत असे त्यांना दाखवायचे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपाच पुसून जाईल
बाबासाहेब आंबेडकर केवळ एका पक्षाचे नव्हते. प्रबोधनकार आणि त्यांचे ऋणानुबंध होते. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेही म्हणायचे की, महाराष्ट्राने देशाला दोन दैवते दिली आहेत. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. महाराजांचा भाजपाने अपमान केला आणि आता आंबेडकरांचे नाव पुसायला निघाले आहेत. पण याद राखा, भाजपावाले पुसले जातील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.