रवि पाटील यांच्या प्रचारात मुलासह प्रमुख कार्यकर्ते गैरहजर
। पेण । विशेष प्रतिनिधी ।
महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांच्या प्रचाराच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी त्यांचे थोरले चिरंजीव तथा आमदारकीचे इच्छुक उमेदवार भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांची अनुउपस्थिती होती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये वैकुंठ पाटील यांना राजकीय कार्यक्रमापासून दूर ठेवल्याची दबक्या आवाजात एकच चर्चा सुरु होती. त्याचबरोबर वैकुंठ पाटील यांचे समर्थक भाजप जिल्हा सरचिटणीस मिलींद पाटील हे वाशी विभागात कार्यक्रम होउनही गैरहजर होते. एकंदरीत वैकुंठ पाटील यांच्या उमेदवारीवरून पाटील घरामध्ये झालेले मनभेद अजून शांत झाल्याचे चित्र दिसत नाही.
पंचायत समितीचे माजी सदस्य तथा रविशेठ पाटील यांचे खंद्दे समर्थक व्हि.बी.पाटील यांनी आपल्या मनोगतात दादासोबत राहतील का? अशा प्रकारे वक्तव्य करून सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनात शंका निर्माण केली. तर धैर्यशील पाटील यांचे खंद्दे समर्थक मंगेश दळवी यांनी व्हि.बी.पाटील यांच्या वक्तव्यावर चोख उत्तर देत धैर्यशील पाटील यांचे कार्यकर्ते कसे नियोजनबध्द प्रचार करणार आहेत, याबाबत वक्तव्य केले.
एकंदरीत नेते एकत्र येउनही कार्यकर्ते एकत्र आल्याचे दिसत नाहीत. तर भाजळचे जिल्हा निवडणूक प्रमुख सतीश धारप यांनीदेखील पेण विधानसभा मतदार संघाकडे पाठ फिरवल्याची चर्चा जोर धरत आहे. ते देखील प्रचाराच्या नारळ वाढविण्याच्या कार्यक्रमाला तसेच नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाला गैरहजर होते. एकंदरीत महायुतीत मान अपमानाचे नाटय सुरू असल्याचे दिसून येते.