बूथ कार्यकर्त्यांची बैठकीकडे पाठ
| पेण | प्रतिनिधी |
पेणमध्ये रविवारी (दि.14) परशराम बागेमध्ये भाजप बूथ कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकार्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीची वेळ सकाळी दहाची घोषित केली होती. परंतु, 12 वाजले तरी हॉल रिकामाच होता. या बैठकीचे निरीक्षक म्हणून आमदार प्रसाद लाड येणार होते. त्यामुळे हॉल भरण्याची लगबग सुरु होती. हॉलमध्ये एकूण 250 खुर्च्या टाकण्यात आल्या होत्या. इतर खुर्च्या बाजूला ठेवण्यात आल्या होत्या. कार्यकर्ते जमावेत म्हणून नेतेमंडळींकडून मटणाचा बेतदेखील आखण्यात आला. तरीदेखील भाजप कार्यकर्त्यांनी या बूथ बैठकीकडे पाठ फिरवली. नेतेमंडळींना 700 कार्यकर्ते जमतील, अशी अपेक्षा होती. परंतु, हॉलमध्ये एकूण नेतेमंडळी धरुन 270 कार्यकर्ते जमले होते. कार्यकर्त्यांची भावना एकच होती, कमळाचा उमेदवार नसल्याने आम्ही मदत करणार नाही.
भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी आपल्या मनोगतात आम्हाला कमळ हवं होतं, घड्याळावर हात जायला थोडा वेळ जाईल असे सांगून कमळासाठी कशी तयारी केली होती, हे निरीक्षकांना पटवून दिले. तर, जिते गावचे अविनाश पाटील यांनी आपली खदखद व्यक्त करताना शेरोशायरीत सांगितले की, आमचा उमेदवार सोडून दुसर्या उमेदवाराला मदत करणे सोपे नाही, तर भाजप उपजिल्हा प्रमुख वैकुंठ पाटील यांनी सांगितले की, भाजपला जागा मिळाली असती तर नक्कीच आम्हाला आनंद झाला असता. या एका वाक्यावर कार्यकर्त्यांना कडकडून टाळ्या वाजवल्या. यावरुन कार्यकर्त्यांच्या मनात काय चालेले आहे, याचे चित्र स्पष्ट झाले. तर, मनोगत व्यक्त करण्यासाठी जाणार्या कार्यकर्त्यांना निवेदकाकडून तंबी दिली जात होती, तटकरेंविरुध्द बोलू नका. त्यामुळे कोणी कार्यकर्ते बोलायला पुढे येत नव्हते.
सुुशील कुमार शर्मा म्हणून एक परप्रांतिय जे भाजपचे रायगड मीडिया प्रमुख आहेत, त्यांना तटकरेंचा इतिहास माहिती ना भूगोल, ते कार्यकर्त्यांना आवाहन करीत होते की, तटकरेंना मदत करा. यावर हॉलमध्ये कुजबूज सुरु होती की, हा सांगणारा कोण, याला कोणी अधिकार दिले. तर, भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील यांनी कमळावर शिक्का मारायला रायगडकरांना मिळणार नाही, हे शल्य उरात राहणार आहे. कमळ फुलवण्याची संधी होती, पण ते फुलवू शकत नाही, अशी आपली लटकी बाजू बोलवून दाखवली. तर प्रशांत ठाकूर यांनी कबूल केले की, उत्स्फूर्त येणारे कार्यकर्ते आज साखरपुडा आहे, हळद आहे, अशी कारणे पुढे करुन येत नाही, यावरुन कार्यकर्ते नाराज आहेत हे आम्ही मान्य करतो. जुन्या घटना एका दिवसात संपत नाहीत. एकंदरीत, कार्यकर्ते नाराज असल्याचे नेतेमंडळींना मान्य करावे लागले, तर पेणचे आमदार रवीशेठ पाटील यांनी नकळत बोलून गेले, तटकरेंविषयी काय बोलू, आत्ता ते आपले उमेदवार आहेत. या एका वाक्यात पूर्ण हॉलमध्ये हास्य पिकले. यावरून आमदार रवीशेठ पाटील यांच्या मनात काय चालले आहे.
निरीक्षक आमदार प्रसाद लाड यांनी पेणकरांना पुन्हा एकदा राज्यसभेचे मृगजळ दाखवून तटकरेंना मदत करण्याचे आवाहन केले. एकंदरीत, आज बूथ कमिटीच्या बैठकीमध्ये कार्यकर्ते ना मनाने आले होते, ना तनाने एवढे निश्चित. कार्यकर्त्यांची कुजबूज एकच सुरु होती की, खासदारकीचे तिकीट दिले नाही तर राज्यसभेचे तिकीट तरी देतील का?
या बैठकीच्या व्यासपीठावर आमदार प्रसाद लाड, आ. प्रशांत ठाकूर, आ. रवीशेठ पाटील, बाळासाहेब पाटील, जि.प. सदस्य डी.बी. पाटील, जि.प. सदस्य प्रभाकर म्हात्रे, मा. नगराध्यक्ष प्रीतम पाटील, वैकुंठ पाटील, श्रीकांत पाटील, मिलिंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. परंतु, या कार्यकर्त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होते की, जिल्ह्यात सुनील तटकरे यांच्या अस्तित्वालाच धक्का दिला आहे.