नगराध्यक्षपदी भावना घाणेकर दणदणीत विजयी; महाविकास आघाडीचा ऐतिहासिक विजय
| उरण | प्रतिनिधी |
उरण नगरपालिकेत गेली अनेक वर्षे माजलेली भाजपाची दडपशाही, भ्रष्टाचार आणि जनतेला गृहीत धरणारी राजवट अखेर उरणकरांनी मतपेटीतून चिरडून टाकली आहे. विकासाच्या नावाखाली शहराला अंधारात लोटणाऱ्या, जनतेच्या पैशांवर डल्ले मारणाऱ्या आणि उरणला दलालांच्या हवाली करणाऱ्या भाजप आमदार महेश बालदी आणि त्यांच्या समर्थक टोळीला उरणच्या जनतेने थेट जागा दाखवली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवत नगरपालिकेतील भाजपाचा किल्ला जमीनदोस्त केला आहे.
नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी दणदणीत मताधिक्याने विजय मिळवला असून, एकूण 21 पैकी 9 नगरसेवक महाविकास आघाडीचे निवडून आले आहेत. तर, भाजपचे 11 नगरसेवक निवडून आले. हा निकाल म्हणजे केवळ नगरपालिकेतील सत्तांतर नसून, आमदार महेश बालदी यांच्या तथाकथित राजकीय साम्राज्यावर बसलेला जबरदस्त घाव आहे.
भाजपाच्या सत्ताकाळात उरण शहराचा सर्वांगीण विकास होण्याऐवजी शहराची अक्षरशः राखरांगोळी करण्यात आली. रस्त्यांची चाळण, पाण्याची टंचाई, अस्वच्छता, बकाल नागरी सुविधा आणि जनतेच्या प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष हेच भाजपाच्या कारभाराचे दर्शन होते. केंद्रात व राज्यात सत्ता असूनही उरणकरांच्या नशिबी भकासपणा आला. तरीही ‘आमदार दमदार’ अशा पोकळ वल्गना करून जनतेची दिशाभूल केली जात होती. अखेर उरणच्या जनतेचा संयम सुटला आणि यावेळी भाजपाला धडा शिकवण्याचा निर्धार मतपेटीतून प्रत्यक्षात उतरवण्यात आला.
नगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला महाविकास आघाडीकडे नगराध्यक्षपदासाठी ठोस उमेदवार नव्हता. मात्र, भाजपविरोधात सर्वपक्षीय एकजूट करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या नावावर एकमुखी शिक्कामोर्तब करण्यात आले. उमेदवारी जाहीर होताच भावना घाणेकर यांनी सत्ताधारी भाजपाच्या गलथान व भ्रष्ट कारभारावर थेट हल्ला चढवला.
प्रचारादरम्यान भावना घाणेकर यांनी जनतेच्या पैशांची कशी लूट झाली, विकासाच्या नावाखाली कसे घोटाळे झाले, हे निर्भीडपणे सभांमधून मांडले. विशेष म्हणजे एका महिला उमेदवाराने एवढ्या आक्रमकतेने सत्ताधाऱ्यांचा पर्दाफाश केल्याने जनतेत मोठ्या प्रमाणात मतपरिवर्तन झाले. विशेषतः महिला वर्गात भाजपाविरोधात तीव्र असंतोष निर्माण झाला आणि त्याचा थेट फटका भाजपाला बसला.
या निकालामुळे उरण नगरपालिकेतील भाजपाची जुलमी सत्ता पूर्णतः संपुष्टात आली असून, आमदार महेश बालदी यांच्या राजकीय दबदब्यालाही जबरदस्त हादरा बसला आहे. उरणमध्ये भाजपाची उतरती कळा सुरू झाली नसून, त्यांच्या सत्तेचा ऱ्हास सुरू झाल्याची चर्चा आता उघडपणे रंगू लागली आहे.
उरण नगरपालिकेतील या सत्तांतराचे पडसाद आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत उमटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपाची जुलमी राजवट प्रत्येक पातळीवर उलथवून लावल्याशिवाय महाविकास आघाडी शांत बसणार नाही, असा ठाम इशारा महाविकास आघाडीचे नेते, माजी आमदार व जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांनी दिला आहे.
नवनिर्वाचित नगराध्यक्ष भावना घाणेकर, नगरसेवकांचे माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, उपजिल्हाप्रमुख नरेश रहालकर, काँग्रेसचे मिलिंद पाडगावकर, बबन कांबळे, मनसेचे जिल्हाप्रमुख संदेश ठाकूर आदींसह अनेकांनी अभिनंदन केले.
