ठाण्यावरचा दावा भक्कम करणार
| ठाणे | प्रतिनिधी |
ठाण्यातील भाजपच्या नव्या भव्यदिव्य ठाणे जिल्हा विभागीय मुख्यालयाचे अनावरण आज, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने भाजप शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले . एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा ठोकलेला असताना आणि त्यासंबंधीचा तिढा सुटलेला नसताना भाजप ठाण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करत ठाण्याचे ‘ठाणेदार’ आपणच असल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगताना दिसेल.
ठाणे शहरातील पोखरण रोड क्रमांक एक येथे असलेल्या या कार्यालयाच्या सभोवतीचा परिसर आजपासूनच भाजपच्या झेंड्यांनी वेढला आहे. या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने भाजप पदाधिकार्यांची बैठक आज या कार्यालयात सुरु असून ठाण्यातील कार्यक्रम आटोपून उपमुख्यमंत्री फडणवीस बदलापूर येथे भाजप आमदार किसन कथोरे यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला रवाना होणार असल्याचे वरिष्ठ भाजप नेत्यांनी सांगितले.
कल्याण लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केल्याने, आता ठाणे लोकसभा मतदारसंघ हिसकाविण्यासाठी भाजप जोरदार तयारी करत आहे. पडद्यामागे त्यासंबंधीची रणनीती आखण्यात येत आहे. त्याच रणनीतीचा भाग म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून ठाण्यात भाजपचा अप्रत्यक्षरीत्या दावा असल्याचे सांगितले.