ठिकठिकाणी रास्ता रोको, चक्काजाम
। मुंबई । प्रतिनिधी ।
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपने शनिवारी राज्यभर चक्काजाम आंदोलन केले. राज्याच्या विविध भागांत भाजप नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांनी रास्ता रोको, चक्काजाम आणि विविध आंदोलनाद्वारे आपला रोष व्यक्त करीत सरकारला जाब विचारला.
ओबींसींची जातनिहाय जनगणना करा, राजकीय व इतर क्षेत्रातील व जिल्ह्यातील आरक्षण पूर्ववत करा, अन्यथा सत्ता सोडा, ओबीसींच्या मागण्या अबाधित ठेवा, अशा मागण्यांसह भाजपने राज्यभर राज्य सरकारविराधोत चक्काजाम आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपचे कार्यकर्ते आणि ओबीसी नेते रस्त्यावर उतरले होते. बीड, औरंगाबाद, नवी मुंबई आणि इतर ठिकाणी आंदोलन करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षण गेलं. राज्य सरकार आपल्या अपयशाचं खापर मोदींवर फोडते आहे, अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली. तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात ओबीसी नेत्यांचं महत्त्व ताटातल्या चटणीएवढं, अशी बोचरी टीका फडणवीसांनी मंत्रिमंडळातील ओबीसी नेत्यांवर केली.