। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल विधानसभा मतदार संघातून चौथ्यांदा निवडणूकीसाठी उभे असलेले प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि.10) ठाकूर यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते रामदास आठवले यांच्या सभेचे आयोजन कामोठे येथे करण्यात आले होते. या सभेत गाण्याचे कार्यक्रम आणि जादूचे प्रयोग ठेवून गर्दी जमवण्याचा आटापिटा भाजपा कार्यकर्त्यांना करावा लागला.
महायुतीतर्फे पनवेल विधानसभेची निवडणूक लढवत असलेले आ. प्रशांत ठाकूर मतदार संघात विकास कामे करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. तीनवेळा आमदार राहूनही मतदार संघातील समस्या जैसे थे असल्याने मतदारसंघात आ. ठाकूर यांच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे. याचमुळे निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीच्या पदाधिकार्यांना भाड्याने कार्यकर्ते आणावे लागत आहेत. सभांना अपेक्षित गर्दी जमा होण्यासाठी वेळ लागत असल्याने जमलेल्या कार्यकर्त्यांना एका ठिकाणी खिळवून ठेवण्यासाठी तसेच गर्दी जमवण्यासाठी गाण्याचे तसेच जादूचे प्रयोग सभेच्या स्टेजवर आयोजित करण्याची वेळ भाजपा कार्यकर्त्यांवर ओढावली आहे.