राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपची कसोटी

प्रा. नंदकुमार गोरे
पाच राज्यांमधल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेलं यश आणि काही महिन्यांपूर्वी राज्यसभेच्या मिळालेल्या जागा पाहता मित्रपक्षांसह भाजपा बहुमत गाठेल असं वाटलं होतं; परंतु आता होणार्‍या 57 जागांच्या निवडणुकांचा अंदाज घेता भाजपा आणि मित्रपक्षांपुढे आहेत त्या जागा टिकवण्याचं मोठं आव्हान आहे. अलिकडेच जागांची शंभरी गाठणारा भाजप पुन्हा शंभरीच्या आत येण्याची शक्यता आहे.

दर दोन वर्षांनी राज्यसभेच्या एक तृतियांश जागा रिक्त होत असतात. आता महाराष्ट्रातल्या सहा जागांसह एकूण 57 जागांवरच्या सदस्यांचा कालावधी संपला आहे. राज्यसभेच्या या 57 जागांसाठी दहा जून रोजी मतदान होणार आहे. यासोबतच खासदारांच्या राजीनाम्यामुळे तेलंगणातल्या एका जागेसाठी 30 मे रोजी आणि ओडिशातल्या राज्यसभेच्या जागेसाठी 13 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. अशा प्रकारे पुढील महिन्यात 15 राज्यांमध्ये राज्यसभेच्या 59 जागांवर निवडणुका होणार आहेत. या 59 जागांपैकी भाजपकडे सध्या 25 जागा आहेत. त्यांच्या मित्रपक्षांबद्दल बोलायचं झालं तर गेल्या वेळी संयुक्त जनता दलाला दोन आणि अण्णा द्रमुकला तीन जागा मिळाल्या होत्या. एका राष्ट्रपतीपुरस्कृत खासदाराचा समावेश केला तर सध्या या 59 पैकी 31 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे आहेत. येत्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी आपल्या जागा वाचवणं हेच मोठं आव्हान आहे.

विधानसभेच्या आमदारांची संख्या लक्षात घेतली तर या वेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सात ते नऊ जागांचं नुकसान सहन करावं लागेल. काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सदस्यांची संख्या आता 13 झाली आहे. त्यात काँग्रेसचे आठ, द्रमुकचे तीन, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक खासदार आहे. पुढच्या महिन्यात होणार्‍या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या दोन ते चार जागांचा फायदा होण्याची शक्यता आहे. निवृत्त होणार्‍या खासदारांमध्ये समाजवादी पक्षाच्या तीन, बिजू जनता दलाच्या चार, संयुक्त जनता दलाच्या चार, बसपच्या दोन, तेलंगणा राष्ट्र समितीच्या तीन तर वायएसआर काँग्रेस, अकाली दल आणि राष्ट्रीय जनता दलाच्या एका खासदाराचा समावेश आहे. अशा प्रकारे सध्या इतर पक्षांच्या खासदारांची संख्या 15 आहे. या वेळच्या राज्यसभा निवडणुकीत इतर पक्षांना तीन जागांचा फायदा मिळण्याची शक्यता आहे.
यावेळी उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील खराब कामगिरीचा फटका येत्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस आणि बसपला सहन करावा लागणार आहे. बसपकडे दोन आणि काँग्रेसकडे एक जागा होती; पण आता या तीनपैकी दोन जागा भाजपकडे जाऊ शकतात. अशा प्रकारे दोन जागांच्या फायद्यासह भाजपा आपले सात सदस्य राज्यसभेवर पाठवू शकतो. त्याचबरोबर पूर्वीप्रमाणे समाजवादी पक्षाच्या खात्यात तीन जागा येण्याची शक्यता आहे. उर्वरित 11 व्या जागेसाठी भाजपा आणि समाजवादी पक्ष यांच्यात चुरस आहे पण भाजपची आक्रमक शैली आणि चांगली रणनीती पाहता ही जागा भाजपच्या खात्यात जाऊ शकते.

महाराष्ट्रातून राज्यसभेचे सहा सदस्य निवडले जाणार आहेत. त्यापैकी तीन जागा भाजपकडे आहेत तर महाराष्ट्रात एकत्र सरकार चालवणार्‍या शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे प्रत्येकी एक जागा आहे. आकड्यांच्या आधारावर या वेळी भाजपला महाराष्ट्रात एक जागा गमवावी लागू शकते. भाजपचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी समन्वयानं निवडणुका लढवल्या तर काही अपक्ष आमदारांची मतं पदरात पाडून घेऊन चार जागा जिंकून एका जागेच्या फायद्यात राहू शकतात. संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, डॉ. विनय सहस्त्रबुद्धे हे तिघे पुन्हा राज्यसभेवर निवडून जाऊ शकतात. गेल्या काही वर्षांमधली महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या जागांची निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा पाहता या वेळीही सहा जागांची निवडणूक बिनविरोध पार पडण्याची शक्यता आहे. आता शिवसेनेने दुसरा उमेदवार उभा करण्याची घोषणा केली असली तरी नंतर तडजोडीने सहा जागांसाठी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जास्त आहे. मागच्या राज्यसभा निवडणुकीवेळी भाजपने राज्यसभेवर संभाजीराजे यांची राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून वर्णी लावली होती. आता संभाजीराजेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याच्या दिशेने पाऊल टाकलं असलं तरी राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून उडी घेतली आहे. भारतीय जनता पक्षाकडे असणारी जादा मतं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला पाठिंबा लक्षात घेता संभाजीराजांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस महाराष्ट्रातून कुणाला संधी देणार याकडे लक्ष लागणं स्वाभाविक आहे.
तामिळनाडूमध्ये राज्यसभेच्या सहापैकी प्रत्येकी तीन जागा द्रमुक आणि अण्णा द्रमुककडे आहेत. विधानसभेतल्या सदस्यसंख्येच्या आधारे द्रमुकचे चार उमेदवार निवडणूक जिंकू शकतात. याचा अर्थ द्रमुकचा एका जागेचा फायदा होऊ शकतो. अण्णा द्रमुकच्या दोन जागा निवडून येऊ शकतात तर एका जागेचा तोटा होऊ शकतो. संख्याबळाच्या आधारे राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बिहारमध्ये एक जागा गमवावी लागणार आहे. पूर्वीप्रमाणेच भाजपा आपले दोन उमेदवार आरामात राज्यसभेवर पाठवू शकतो परंतु कमी आमदारांमुळे त्यांचा मित्रपक्ष संयुक्त जनता दल या वेळी केवळ एकच उमेदवार जिंकण्याच्या स्थितीत आहे. संयुक्त जनता दलाची कमी होणारी जागा राष्ट्रीय जनता दलाच्या पारड्यात जाऊन त्या पक्षाला दोन जागा मिळू शकतात. भाजपला या वेळी सर्वात जास्त नुकसान आंध्र प्रदेशमध्ये होणार आहे. आंध्र प्रदेशमध्ये चार जागांवर निवडणुका होणार असून त्यापैकी तीन भाजपच्या खात्यात आहेत. पण यावेळी विधानसभेच्या सदस्यसंख्येच्या आधारावर वायएसआर काँग्रेसचे उमेदवार चारही जागांवर विजय मिळवू शकतात.

कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाने काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या आमदारांना फोडून सत्ता मिळवली असली तरी गेल्या वेळच्या तुलनेत भाजपला राज्यसभेच्या जागांवर फारसा फायदा होणार नाही. कर्नाटक विधानसभेतल्या सदस्यसंख्येच्या आधारे भाजप मागच्या वेळेप्रमाणे या वेळीही आपले दोन उमेदवार राज्यसभेवर पाठवू शकतो. दुसरीकडे, काँग्रेसचा फक्त एक उमेदवार आरामात निवडणूक जिंकू शकतो. भाजपा, काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाकडे चौथ्या जागेसाठी पुरेसे आमदार नाहीत. त्यामुळे ही चौथी जागा कोणाच्या खात्यात जाणार हे बघण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आमदारांची फोडाफोड करण्यात निष्णात असलेलाच तिथे चौथ्या जागी निवडून जाऊ शकतो. राजस्थानमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक होणार आहे, त्या सर्व जागा सध्या भाजपच्या ताब्यात आहेत. मात्र या वेळी अशोक गेहलोत यांची तयारी पाहता भाजपला तीन जागांचं नुकसान सहन करावं लागू शकतं. आमदारांच्या संख्येच्या आधारे राजस्थानमध्ये भाजपाचा एक आणि काँग्रेसचे दोन उमेदवार जिंकण्याची खात्री आहे, मात्र अपक्ष आमदारांच्या बळावर काँग्रेस राजस्थानमधली तिसरी जागाही जिंकू शकते. मध्य प्रदेशमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस या दोघांसाठीही ‘ना नफा ना तोटा’ अशी परिस्थिती असणार आहे. म्हणजेच गेल्या वेळेप्रमाणे या वेळीही भाजपा दोन आणि काँग्रेस एक उमेदवार राज्यसभेवर सहज पाठवू शकते.
ओडिशात राज्यसभेच्या तीन जागांसाठी दहा जून रोजी मतदान होणार आहे, त्या सध्या राज्याचा सत्ताधारी पक्ष बिजू जनता दलाकडे आहेत आणि विधानसभेच्या संख्याबळाच्या आधारे तीनही जागा तो पक्ष जिंकण्याची खात्री आहे. खासदार सुभाषचंद्र यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर इथे 13 जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्यात बिजू जनता दलाचा विजय निश्‍चित आहे. खासदार सुभाषचंद्र यांचा कार्यकाळ दोन एप्रिल 2026 रोजी संपणार होता; परंतु कटकच्या महापौरपदी निवडून आल्यानं त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तेलंगणामध्ये राज्यसभेच्या दोन जागांवर निवडणूक होणार असून या दोन्ही जागांवर सध्या राज्यातला सत्ताधारी पक्ष असलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीचे खासदार आहेत. विधानसभेतल्या आमदारांच्या संख्येच्या आधारे या दोन्ही जागांवर पुन्हा तेलंगणा राष्ट्र समितीचा विजय निश्‍चित आहे. या दोन जागांशिवाय तेलंगणातून राज्यसभेच्या तिसर्‍या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. डॉ. बंदा प्रकाश यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर 30 मे रोजी पोटनिवडणूक होणार आहे. विधान परिषदेवर नामनिर्देशित झाल्यानंतर डॉ. बंदा प्रकाश यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ही जागा यापूर्वीही तेलंगणा राष्ट्र समितीच्या खात्यात होती आणि या वेळीही तेलंगणा राष्ट्र समितीचा विजय निश्‍चित आहे.

Exit mobile version