भाजपची परिवर्तन तर सेनेची निष्ठा हंडी

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबई, ठाण्यात आज दहीहंडीचा चांगलाच उत्साह दिसून आला. मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने आज दमदार हजेरी लावल्याने गोविंदा पथकांचा उत्साह आणखीच शिगेला पोहचला. भाजपच्या वतीने 400 दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. लालबागमध्ये भाजपने बदलाची दहीहंडी उभारली. तर वरळीत परिवर्तनाच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. दादरमध्ये शिवसेना भवनजवळ युवासेनेकडून  निष्ठा दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. काही ठिकाणी आठ थर तर काही ठिकाणी नऊ थर रचण्यात आले. सायंकाळपर्यंत दहा थरांचा विक्रम रचला नव्हता. दरम्यान, दुपारी तीन वाजेपर्यंत महापालिकेच्या रुग्णालयात 35 जखमी गोविंदांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मुंबई, ठाण्यात राजकीय नेत्यांची ठळक उपस्थिती दिसली. टेंबी नाका येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उत्सवाचे आयोजन केले. अवधूत गुप्ते आणि इतर सेलिब्रिटींनी हजेरी लावत गोविंदांचा उत्साह वाढवला. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. 

आळंदीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समाधी मंदिराचा गाभारा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता. समाधीवर श्रीकृष्णाचा अवतार रेखाटण्यात आला होता. पंढरपुरात विठ्ठल मंदिरात रात्री 12 वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा झाला. यावेळी शेकडो विठ्ठल भक्ताने या सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. यापूर्वी विठुरायाला अनोख्या रुपात सजविण्यात आले होते. डोक्यावर पगडी, अंगावर अंगी, धोतर आणि त्यावर मोठी कुंची घालण्यात आली होती. गुरख्याचे रूप दिलेल्या विठुरायाच्या हातात चांदीची काठी देऊन देवाच्या मागे मोरपिसे लावण्यात आली होती. विठुराया हा विष्णूचा अवतार असल्याने विठ्ठल मंदिरात जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही हा उत्सव श्रद्धने आणि उत्साहात साजरा करण्यात येत आहे. रात्री बारा वाजता चांदीच्या पाळण्यात बाल कृष्णाची मूर्ती ठेवून कीर्तन झाल्यानंतर कृष्णजन्माचे स्वागत करण्यात आले. आज दिवसभर साई समाधी शेजारी गोपाल कृष्णाचा फोटो ठेवून त्याची पूजा करण्यात आली. 

Exit mobile version