रायगडच्या चार कराटेपटूंना ब्लॅक बेल्टचा मान

नागावमध्ये कराटे परीक्षा उत्साहात

| चौल | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील नागाव येथे पार पडलेल्या कराटे बेल्ट परीक्षेत रायगड जिल्ह्यातील चार विद्यार्थ्यांनी ब्लॅक बेल्ट मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अलिबाग तालुक्यातील नागाव येथील संचालक मंडळ नागाव हायस्कूलमध्ये दि. 29 मार्च 2026 रोजी ब्लॅक बेल्ट व कलर बेल्ट कराटे परीक्षा उत्साहात पार पडली. इंडियन ओकिनावा शोरीन रियू क्युडोकान कराटे-डो इंडिया या संस्थेतर्फे आयोजित या परीक्षेत रायगड व नाशिक जिल्ह्यातील एकूण 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

या परीक्षेत अलिबाग तालुक्यातील नागाव हायस्कूलमध्ये प्रशिक्षण घेणारे सुजल सचिन कवळे (नागाव), ओमकार सचिन बर्वे (भादाणे), मेधांश मनिष पाटील (सहाण) आणि हंश रोशन पाटील (साखर आक्षी) या चार विद्यार्थ्यांनी ब्लॅक बेल्ट परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. या सर्व विद्यार्थ्यांनी जिल्हा, विभागीय, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील विविध कराटे स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला असून, सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे.

इंडियन ओकिनावा शोरीन रियू क्युडोकान कराटे-डो इंडिया या संस्थेच्या माध्यमातून नागाव येथे गेली अनेक वर्षे नियमित प्रशिक्षण दिले जात असून, अलिबाग व मुरुड तालुक्यांमध्येही कराटे प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. या विद्यार्थ्यांना मुख्य प्रशिक्षक सिहान अरुण बोडके (भारत), रेंशी अरविंद गजानन भोपी (रायगड) तसेच सेंसाय प्रसाद प्र. चौलकर (नवी मुंबई) यांचे मार्गदर्शन लाभले. याशिवाय सेंपाय राधा संदीप ढापरे, अनुश्री अरविंद भोपी, वेद संजय पाटील आणि दुर्वा निलेश नाईक यांनीही मोलाचे सहकार्य केले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे संचालक, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच पालकांनी त्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version