गॅस सिलिंडरचा काळा बाजार

| ठाणे | प्रतिनिधी |

अंबरनाथ येथील एमआडीसीत अत्यंत धोकादायक पद्धतीने घरगुती सिलिंडरमधील गॅस व्यवसायिक सिलिंडरमध्ये भरून असे सिलिंडर काळ्या बाजारात विकले जात होते. असे 500 सिलिंडर्स पोलिसांनी छापा टाकून जप्त केले आहेत. तसेच, या सिलिंडर्समध्ये बेकायदा पद्धतीने गॅस भरण्याची साधनेही ताब्यात घेण्यात आली आहेत.

अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसीत बोहोनोली गावाजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये सिलिंडरमध्ये गॅस भरण्याचा कारखाना सुरू होता. या कारखान्यात पाचशे पेक्षा जास्त सिलिंडर्स, भारत गॅस, एचपी, गो गॅस, स्फुर्ती या कंपन्यांचे सिलिंडर्स आढळून आले. यावेळी कोणतीही सुरक्षेची काळजी न घेता हे काम राजरोसपणे सुरू होते. या कामामुळे आजू बाजूला केमिकल कंपन्या असल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. मात्र, या अनधिकृत कारखान्याबाबत एमआयडीसी अधिकाऱ्यांना तसेच कोणत्याही स्थानिक प्रशासनाला माहिती नव्हते. रात्री एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने शिवाजीनगर पोलिसांकडून या कारखान्यावर छापा टाकण्यात आला. यावेळी पोलिसांना बघून येथे काम करत असलेले कामगार पळून गेले. मात्र, दोन कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून ही सर्व यंत्रणा तत्काळ बंद करण्यात आली. यामुळे मोठा अपघात टळला असुन पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version