शांतता क्षेत्रात स्पीकरचा दणदणाट

अलिबाग पोलिसांकडून बघ्याची भूमिका

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबागमधील जिल्हा टपाल कार्यालय ते क्रीडा संकुल हा परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित असून, या भागात ध्वनिक्षेपक व वाद्यांवर बंदी आहे. याच परिसरात गुरुवारी सत्ताधारी आमदारांच्या कार्यक्रमासाठी मोठ्या आवाजात स्पीकर लावण्यात आल्याचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी आपले सरकार पोर्टलवरून आवश्यक परवानगी घेण्यात आली नसल्याची माहिती समोर येत असून, पोलिसांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची चर्चा रंगली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या हितासाठी हा परिसर शांतता क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे ध्वनिक्षेपक अथवा वाद्य वापरण्यास मनाई आहे. गणेशोत्सवातील मिरवणुकीतही या परिसरातून वाद्य न वाजविण्याचे आदेश असतात. मात्र, गुरुवारी (दि. 23) सकाळी शिंदे गटाच्या आमदारांच्या कार्यक्रमासाठी रुग्णालयाच्या हाकेच्या अंतरावर तीन ते चार स्पीकर लावण्यात आले होते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ध्वनिक्षेपक वापरण्यासाठी आपले सरकार पोर्टलवरून परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, आयोजकांनी अशी कोणतीही परवानगी घेतली नसल्याची चर्चा असून, केवळ अलिबाग पोलीस ठाण्यात एक पत्र दिल्याचे समजते. त्यामुळे शांतता क्षेत्रात विनापरवाना ध्वनिक्षेपकाचा वापर करून नियमांचे उल्लंघन झाले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सौजन्याची रुग्णाहिका शल्यचिकित्सकांच्या नावावर
गुरुवारी जिल्हा रुग्णालय परिसरात आमदारांच्या सौजन्याने मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. मात्र, एमएच-06-बीडब्ल्यू-5303 क्रमांकाची ही रुग्णवाहिका जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नावावर नोंद असून, तिची खरेदी 22 फेब्रुवारी 2021 रोजी झाली असून, 9 एप्रिल 2021 रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या रुग्णवाहिकेची किंमत सुमारे 19 लाख 57 हजार 187 रुपये असल्याचे समजते. पाच वर्षांपूर्वी खरेदी झालेल्या सरकारी रुग्णवाहिकेचा आता लोकार्पण सोहळा का करण्यात आला? तसेच ती आमदारांच्या सौजन्याने दिल्याचा उल्लेख का करण्यात आला? असा प्रश्न उपस्थित होत असून, रुग्णवाहिकेचे मालक शासन की आमदार? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. कार्यक्रमादरम्यान ही रुग्णवाहिका जुनी असल्याची चर्चाही दबक्या आवाजात रंगली.
Exit mobile version