| तळा | वार्ताहर |
तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे गो.म. वेदक विद्यामंदिर तळा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद प्रदान समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत रोडे, सचिव मंगेश देशमुख, शाळा समितीचे चेअरमन महेंद्र कजबजे, कार्यकारी मंडळाचे सदस्य महादेव बैकर, मुख्याध्यापक दिलीप ढाकणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक एन.सी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला संस्था, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी इयत्ता दहावीचे समृद्धी साळुंखे, अमृता दौडमनी, सिमरन पवार, हेमलता शिगवण या विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. शिक्षक प्रतिनिधी म्हणून रोहित भागवत व मल्लिकार्जुन दौडमनी यांनी आशीर्वादपर मनोगत व्यक्त केले, तर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. पाटील यांनी दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याच कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे आवाहन केले.
संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व कोणत्याही विद्यार्थ्याने परीक्षेच्या कालावधीत मोटारसायकलवर प्रवास करू नये, असे प्रतिपादन केले. यावेळी रोहित भागवत, सुहास भोईर व विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे निवेदन जयश्री मचे, तर आभार मल्लिकार्जुन दौडमनी यांनी मानले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, गो.म. वेदक विद्यामंदिरचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.