अंध मुलांनी घेतला छबिण्याचा आनंद

दृष्टीपल्याडची जत्रा निराळीच
| महाड । वार्ताहर ।

छबिन्यातील आकाश पाळणे, झुक धावणारी आगगाडी, होडीत बसण्याचा, पिपाणी वाजवण्याचा, फुगे उडवण्याचा आनंद छबिन्यामध्ये लाखो नागरिक लुटत असतात. हा आनंद लुटतानाच समाजातील अनेक अंध मुलांना या आनंदापासून वंचित राहावे लागते. या अंध मुलांची ही वेदना लक्षात येऊन महाडमधील काही सेवाभावी व्यक्तींनी पुढाकार घेत त्यांनाही या आनंदसागरात सामावून घेतले. या अंध मुलांनी आपल्या या छबिन्याची अनुभूती घेतली. महाडच्या या छबिन्यात देव-देवतांसोबत आगळ्यावेगळ्या माणुसकीचेही दर्शन घडले.

महाडच्या छबिन्याच्या समारोपाचा क्षण होता रात्रभर नाचविलेल्या पालख्यांचं ओझं खाद्यावरून उतरत होतं. काळ्याभोर आभाळात सूर्याला शोधणार्या उंच सासणकाठया हळू हळू स्पर्धेतून माघार घेत होत्या. दिवट्यांचा लख्ख प्रकाश सूर्यापूढे मिणमिणता झाला होता आणि आयुष्यात सूर्य हरवलेल्यांना पुन्हा सूर्य होता. हाताची गुंफण करीत ख-या अर्थानं डोळस असलेल्या महाडकरांनी त्यांना सूर्य दाखविण्याचा प्रयत्न केला होता. स्नेहज्योती अंध विद्यालयातील त्या सूर्य हरवलेल्यांनी अनुभवली होती एक दृष्टीपल्याडची जत्रा अनुभवास मिळाली होती.

काही दानशूर व्यक्तींनी आपल्या आनंदात समाजातील अंध घटकालाही सामावून घेतले. महाड शहरातील मकरंद जोशी व विकास सौंदलगीकर या दोघांनी काही हा आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे. त्यांच्या या उपक्रमाला आता महाडमधील इतर सेवाभावी व्यक्तींचाही सहभाग मिळू लागला आहे मंडणगड तालुक्यातील घराडी येथील स्नेह ज्योती अंध विद्यालय या शाळेतील मुलांना छबिन्याची सैर घडवून आणतात. यावर्षी शाळेतील 19 विद्यार्थी, मुख्याध्यापिका तसेच शिक्षक वर्ग सहभागी झाले होते. बुधवारी सकाळी या मुलांना जत्रेत आले. प्रत्येक मुलासोबत एक सेवाभावी व्यक्ती पालक म्हणून उपस्थित राहिली होती.

विरेश्‍वराचा गाभारा देखील आज पावन झाला होता. आपल्या हरवलेल्या परमेश्‍वराला स्पर्श करून नेमकं या मुलांनी काय मागितलं असेल हा प्रश्‍न जरी निरूत्तर असला तरी त्यांना आज जो अनुभव महाडकरांनी दिला तो कल्पनातीतच ठरला. विरेश्‍वर महाराजांसमोर नतमस्तक होत त्या आपापल्या नवपालकांसोबत जत्रेतील खेळांचा अनुभव घेतला. फिरत्या ड्रॅगनमधील त्यांचा उत्साहपूर्ण जोश, जम्पींग बॉल वरून हवेत उडतानाचा त्यांचा आवेग आणि मिकीमाऊसची घसरगुंडीवरची मज्जा त्यांनी अनुभवली होती. जत्रेतील त्या गोंगाटात त्यांचा मिसळलेला आवाज पाळण्याच्या उंचीप्रमाणे लहरत होता. पुन्हा एकदा आकाशातील तारे जमिनवर अवतरले होते. त्या नवपाल्यांची खाण्याची व्यवस्था करीत, अतिशय काळजी महाडच्या त्या पालकांनी आपल्या पाल्यांना मनमुराद आऩंद दिला आणि जवळ जवळ चार ते पाच तासाचा सहवास ख-या अर्थाने पावन झाला होता.

मकरंद जोशी, विकास सौंदलगीकर, श्रद्धा मकरंद जोशी, कला शिक्षक नवीन परमार, मित डाकवे, महाडमधील व्यापारी शीला साबळे, श्रीमती बागडे यांच्यासह सुमारे 20 व्यक्ती अंध विद्यार्थी च्या सोबत होत्या. सर्वांना सोबत घेत अंघ मुलांनी संपूर्ण छबिना पालथा घातला. महाडच्या छबिन्यात नाचणार्‍या देव- देवतांच्या पालख्या, सासन काठ्या, धार्मिक उत्सवाचे वातावरण यासोबत माणुसकीचे दर्शन पाहावयास मिळाले.

Exit mobile version