पेणकरांचा महामार्गावर रास्ता रोको; पंधरा दिवसांत खड्डे भरण्याचे आश्‍वासन

| पेण | प्रतिनिधी |

बारा वर्षापासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम जलद गतीने व्हावे आणि महामार्गावर पडलेले खड्डे कायमस्वरुपी भरले जावे याकरिता रविवारी माझं पेण या टॅगलाईन खाली एकत्र येत अर्धा तास मुंबई गोवा महामार्ग रोखून धरण्यात आला.

आंदोलनात तालुक्यातील विविध सामाजिक, वाहतूक संघटना आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी येत्या पंधरा दिवसात खारपाडा ते कोलेटी या पेण तालुक्यातील महामार्गावरील सर्व खड्डे कायमस्वरुपी भरण्याचे लेखी आश्‍वासन देण्यात आले. शिवाय लवकरच या टप्प्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करुन महामार्ग भक्कम स्थितीत करण्यात येईल आणि त्यासाठी जवळपास 239 कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या अधिकार्‍यांनी चर्चेदरम्यान सांगितले. शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पेण पोलीस ठाणे, दादर पोलीस ठाणे, वडखळ पोलीस ठाणे, नागोठणे पोलीस ठाणे, पोयनाड पोलीस ठाणे या पाच पोलीस ठाणे मिळून शंभर कर्मचारी व पंधरा अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.

या होत्या प्रमुख मागण्या
महामार्गवरील खड्डे कायमस्वरुपी भरण्यात यावेत, अपघात झाल्यास ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, निकृष्ट दर्जाचे काम करणार्‍या ठेकेदारांना टर्मिनेट करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, पेण येथील ओव्हरब्रीज पूर्णपणे काढून टाकून खांबावर आधारीत उड्डाणपूल बांधण्यात यावा, कासू आणि वाशी नाका येथे खांब्यावर आधारित उड्डाणपूलाची उभारणी करण्यात यावी, जोपर्यंत पूर्ण महामार्ग वापरण्याजोगा होत नाही तोपर्यंत टोल नाका सुरु करु दिला जाणार नाही.

प्रशासनाची आश्‍वासने
महामार्गावर पेण हद्दीत पडलेले खड्डे दोन नोव्हेंबर पर्यंत भरणार. कासू आणि वाशी नाका येथील खांबावरील उड्डाणपुलाबाबत येत्या वीस तारखेला गावातील प्रमुख लोकांना सोबत घेउन तपशीलवार विश्‍लेषण झाल्यानंतर 30 नोव्हेंबर पूर्वी मंजुरीसाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण मुख्यालय नवी दिल्ली यांच्याकडे पाठवण्यात येईल, टोल चालू करण्यापूर्वी प्रचलित निकषानुसार रस्ता व सर्व्हिस रोड सुस्थितीत करुन योग्य ठिकाणी सोईनुसार, प्रस्तावित पथदिवे लावून नंतरच टोल सुरु करण्यात येईल, शहरालगत असणारा ओव्हर ब्रीज काढून उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण मुख्यालय नवी मुंबई येथे 30 नोव्हेंबर पूर्वी पाठवण्यात येईल.

पेणकर एकत्र येतात तेव्हा
पेण तालुका हा संघर्ष करुन आपले म्हणणे लावून धरणार्‍यांचा तालुका आहे. यापूर्वी सेझ सारखा भस्मासुराला सळो की पळो करुन सोडले. त्यानंतर पेण येथे रेल्वेला थांबा मिळण्यासाठी संघर्ष केला व शटल सेवा सुरु होण्यासाठी प्रयत्न केले. आजच्या घडीला पेणपासून मुंबईच्या दिशेने शटल सेवा सुरु झाली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दयनीय अवस्थेमुळे पेणकर एकवटले पेणकरांच्या मदतीसाठी अलिबागकर पण धावले. यमराजाचे प्रतिक म्हणून आज खुद्ददस्तूर रस्त्यावर यमच अवतरलेला सर्वांनी पाहिले. त्यामुळे एवढे निश्‍चित की पेणकर एकत्रच येतात तेव्हा निश्‍चित बदल घडवितातच. त्यामुळे आज पेटलेला राष्ट्रीय महामार्गाचा वणवा भविष्यात शासनाविरुद्ध ज्वालामुखी झाल्याशिवाय राहणार नाही.

Exit mobile version