| महाड | प्रतिनिधी |
सामाजिक बांधिलकी जपत जमी जमातुल मुस्लिमीन महाड-पोलादपूर तालुका या संस्थेच्या खिदमत स्क्वॉड यांच्यावतीने गुरुवारी (दि.14) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर महाड येथील दरदमंद उर्दू हायस्कूल येथे सकाळी 9.00 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होत असतो. अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, तसेच थॅलेसेमिया आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना रक्ताची गरज भासत असते. ही गरज लक्षात घेऊन मुस्लिम समाजातील युवकांचे खिदमत स्क्वॉडने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून सुरक्षित पद्धतीने रक्तसंकलन केले जाणार आहे. तसेच, रक्तदात्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. महाड व पोलादपूर परिसरातील नागरिकांनी मानवतेच्या दृष्टीने या उपक्रमात सहभागी होत रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन खिदमत स्क्वॉडच्यावतीने करण्यात आले आहे.
महाडमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन
