मनोधैर्य योजनेतून 239 जणांना एक कोटी 39 लाख रुपयांची मदत
| अलिबाग | प्रतिनिधी |
पिडीत महिलांना उभारी देण्यासाठी जिल्हा विधी प्राधिकरणामार्फत मायेची फुंकर घालण्यात आली आहे. 2018 ते 2023 या सहा वर्षात मनोधैर्य योजनेतून 239 जणींना एक कोटी 39 लाख रुपयांचा मदतीचा हात देण्यात आला.
अत्याचार झालेल्या पीडित महिलांचे मनोबळ उंचावण्यासाठी सरकारकडून वेगवेगळा प्रयत्न केला जात आहे. वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून त्यांना बळकट करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामध्ये महिलांना स्व रक्षणाचे धडेदेखील देण्याचे काम केले जात आहे. पिडीत महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी मनोधैर्य योजना सुरु करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी 2 ऑक्टोबर 2013 पासून करण्यात आली. त्यांना अर्थ सहाय्य व पुनर्वसन करण्याचा प्रयत्न या योजनेच्या मार्फत करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात 668 प्रस्ताव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे दाखल झाले. न्यायालयीन प्रक्रीया पुर्ण करून 239 जणींना अर्थ सहाय्य करण्यात आले आहे. एक कोटी 39 लाख 47 हजार 576 रुपयांची मदत करण्यात आली आहे. 429 अर्ज वेगवेगळ्या तांत्रिक बाबीमुळे अपात्र ठरले आहेत.
वर्ष – अर्ज – पात्र – अपात्र – अर्थ सहाय्य( रुपये )
2018 – 76 – 46 – 30 – 3 लाख 90 हजार
2019 – 69 – 40 – 29 – 13 लाख 50 हजार
2020 – 71 – 32 – 39 – 15 लाख
2021 – 97- 16 – 81 – 9 लाख 90 हजार
2022 – 166 – 34 – 132 – 31 लाख 80 हजार
2023 (ऑक्टोबरपर्यंत) – 189 – 71 – 118 – 65 लाख 37 हजार 500
एकूण – 668 – 239 – 429 – 1 कोटी 39 लाख 47 हजार 500
पीडित महिलांना बळकट करण्यासाठी मनोधैर्य योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेमार्फत 239 महिलांना अर्थ सहाय्य करण्यात आले आहे.
अमोल शिंदे – सचिव ,जिल्हा विधी प्राधिकरण सेवा, रायगड