| चिरनेर | प्रतिनिधी |
मोरावे येथील मुरबा गणपती मंदिर सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. त्यामुळे पनवेल, ठाणे, भिवंडी, मुरबाड, नवी मुंबईतून संकष्टी चतुर्थीला गणेश भक्तांची प्रचंड गर्दी होत आहे. मुरबा गणपतीचे दर्शन घ्यायचे झाल्यास होडी हा एकमेव पर्याय होता. परंतु, या होड्या छोट्या असून प्रवास करताना धोकादायक ठरत होत्या. मध्यंतरी एक होडी जरा कलंडली होती. ही बाब काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या लक्षात येताच त्यांनी रविवारी (दि.5) संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेमार्फत दुसरी पॅसेंजर बोट उपलब्ध करून दिली. तिचे लोकार्पण महेंद्र घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शुभांगी घरत, काँग्रेसचे डॉ. मनीष पाटील, विनोद म्हात्रे, ॲड. अविनाश ठाकूर, रवींद्र पाटील, श्रीकांत घरत, रमेश घरत तसेच एम.जी. ग्रुपचे सदस्य आणि गणेशभक्त उपस्थित होते.







