आग्राव येथे रंगल्या शिडाच्या होडीच्या स्पर्धा

हरिश्ंचद्र शेट्टी यांची हिरावती होडी प्रथम

| रेवदंडा | प्रतिनिधी |

आग्राव येथे कै. सुभाष चांगू ढेबरी यांचे स्मरणार्थ दर्यासागर मित्रमंडळ पुर्वपाडा आयोजीत कुंडलिका समुद्र खाडीत शिडवाल्या होड्यांच्या शर्यतीत आग्रावचे हरिश्ंचद्र शेट्टी यांची हिरावती होडी प्रथम, कोर्लईचे संतोष बलकवडे यांची कमलावती होडी व्दितीय, तर जयेंद्र वरसोलकर यांची लक्ष्मी होंडी तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.

स्पर्धेचा प्रारंभ शेकाप नेते अ‍ॅड. आस्वाद पाटील यांच्या हस्ते बावटा फडकवून करण्यात आला. आठ शिडवाल्या होड्यांनी सहभाग घेतला होता. सुडकोळी, कुदे येथून ठेवलेल्या जानतीच्या होडीच्या भोवती गोल फेरी पूर्ण करून थेट रेवदंडा पुलापर्यंत परतीचा प्रवासानंतर रेवदंडा येथून पुन्हा आग्राव जेटी या मार्गावर ही स्पर्धा रंगली.

स्पर्धेतील प्रथम क्रमांकास 51 हजार रूपये रोख व भव्य चषक, व्दितीय क्रमांकास 41 हजार रूपये रोख व भव्य चषक, तृतीय क्रमांकास 31 हजार रूपये रोख व भव्य चषक असे बक्षिसे मान्यवरांचे हस्ते वितरीत करण्यात आली.

या स्पर्धेत विजय बाळाराम चोगले, विलास विठोबा वरसोलकर, रामदास बाळाराम चोगले, प्रभाकर चांगू लोदीखान, निकेश कमळाकर नाखवा, नथूराम अष्टमकर, चंद्रकांत किसन पाटील, रविंद्र रामभाऊ चोगले, महेंद्र विठ्ठल सरदार यांनी पंचकमिटी म्हणून काम पाहिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी या स्पर्धेचे अध्यक्ष गोरख विश्‍वनाथ डोयले, उपाध्यक्ष दिपक जानू पाटील, दर्यासागर मित्रमंडळ पुर्वपाडा, आग्राव अध्यक्ष कैलास दामोदर धरणकर, आग्राव कोळी समाज संघटना अध्यक्ष विनोद नागू चोगले आदीसह अलिबाग तन्मेश ज्वेलर्सचे प्रोपायटर उमेश मोरे, तसेच कुंदन भगत यांचे विशेष सहकार्य लाभले. आग्राव पुर्वपाडा ग्रामस्थ व महिला यांनी विशेष परिश्रम घेतले.

Exit mobile version