शिडाच्या बोटींचा थरार

सुलतानी व नूरानी बोटींनी प्रथम क्रमांक पटकावला

| मुरुड-जंजिरा | सुधीर नाझरे |

मुरुड राजापुरी येथील शिडाचे बोट धारक वर्षभर लाखो पर्यटकांना सुरक्षित जंजिरा किल्ल्यात आपल्या बोटीतून घेऊन जात असतात. त्यांच्या या कामाचा गुणगौरव म्हणून, जंजिरा पर्यटक जलवाहतूक राजापुरी व खोरा या संस्थेने बोटधारकांची करमणूक व पर्यटकांना आनंद देण्यासाठी दरवर्षी मार्च महिन्यात शिडाच्या बोटींच्या 2 गटात स्पर्धा भरवल्या जातात. स्पर्धेचा मुख्य उद्देश बोट धारकाला अधिक उत्सहात काम करण्याची स्फूर्ती मिळावी हाच असतो. या वर्षी छोट्या गटात प्रथम क्रमांक सुलतानी बोट, दुसरा क्रमांक रबानी बोट, तिसरा क्रमांक सुलतान बोट, तसेच मोठ्या गटात  प्रथम क्रमांक नूरानी बोट, दुसरा क्रमांक अकबरी बोट, तिसरा क्रमांक दस्तगीर बोट यांनी पटकावला. दोन्ही स्पर्धेत 12 बोटींनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 6 बोटींना रोख रक्कम व पारितोषिक देण्यात आले.


या स्पर्धेसाठी राजापुरीच्या बोटी जय्यत तयारी करत असतात. आपल्या बोटीचे रंगकाम तसेच बोटीचे शिड नवीन किंवा दुरुस्त करून सज्ज करतात. कारण ही बोट हवेच्या दाबावर चालत असते. बोट जेट्टीवरून सुटल्यावर अगरदांडा जेट्टीला फेरी मारून पुन्हा राजापुरी जेट्टीकडे परतायचे असते. जाताना बोटी अतिशय स्पीडमध्ये जातात, मात्र फिरून परत येताना शिड हवेप्रमाणे फिरवून शिडावर बोटीचा समतोल राखून मोठ्या हिमतीने समुद्राच्या लाटांचा मारा सहन करत, अटीतटीची स्पर्धा करत, राजापुरी जेट्टीवर पोहोचतात. त्या प्रसंगी राजापुरी येथील गावकरी व किल्ला पाहण्यासाठी आलेले पर्यटक या स्पर्धेचा आनंद घेतात. तसेच अशा स्पर्धा नेहमी मुरुड किनारी घेण्यात याव्यात, अशी मागणी पर्यटक करत आहेत.

Exit mobile version