उरणमध्ये पावसामुळे बोटी किनार्‍यावर

| उरण । वार्ताहर ।
गेली दोन दिवस विजेच्या कडकडाट व वादळीवार्‍यासह पाऊस पडत असल्याने उरण तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. अतिवृष्टीमुळे मासेमारी करणार्‍या बोटींना समुद्रात धोका निर्माण होऊ शकतो या खबरदारीमुळे करंजा, मोरा, दिघोडे, केळवणे या ठिकाणी कोळी बांधवांनी बोटी किनार्‍यावर नांगरुन ठेवल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप दिल्यानंतर तालुक्यातील करंजा, मोरा, दिघोडे, केळवणे परिसरातील अनेक मासेमारी करणार्‍या बोटींनी समुद्रात जाणे पसंत केले होते.त्यामुळे मच्छी मार्केटमध्ये मासळीची आवक वाढली होती. त्यातच उपासातील श्रावण संपल्याने मासे खवय्यांनी आपला मोर्चा हा मच्छीमार्केटकडे वळविला होता.
मात्र वादळीवार्‍यासह येणार्‍या पावसाचा तडाखा बसल्याने समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना वादळीवार्‍याचा व उसळणार्‍या लाटांचा तडाखा बसत असल्याने कोळी बांधवांनी मासेमारी करणार्‍या बोटी किनार्‍यावर नांगरुन ठेवण्यात सुरक्षित मानले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस माशांची आवक घटणार असल्याचे करंजा मच्छीमार सहकारी सोसायटीचे संचालक हेमंत गौरीकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

Exit mobile version