बोटीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; वेताळ देवाला मासळीसाठी घालणार साकडे
| मुरुड- जंजिरा | प्रतिनिधी |
मुरुड-मागील चार महिन्यांपासून वातावरणातील बदलल्यामुळे मासे फार अल्प प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे प्रमुख आर्थिक स्रोतावर गंभीर संकट असून सुद्धा होळी सणात याचे कुठेही सावट दिसत नाही. होळी सण साजरा करण्यासाठी असंख्य बोटी किनाऱ्यावर येत आहेत. मुरुड परिसरात होळी सण मोठ्या उत्साहात साजरा होते.
होळीच्या 7 दिवस आधी मासेमारीसाठी गेलेल्या बोटी होळीसाठी परतात तेव्हा किनाऱ्यावर येण्याआधी आपली बोट समुद्रात असतानाच फुलांनी सजवतात. भगवे झेंडे, पिवळे झेंडे, बोटीवर डिझे स्पीकर लावून घरी परताना कोळी गाणी वाजवत, नाचत गुलाल उधळत मुरुड किनाऱ्यावर येतात. फटाके वाजवत येणाऱ्या बोटींना पाहण्यासाठी मुरुडकर एकदरा पुलावर गर्दी करतात.आपली सजलेली बोट जेटीवर येताना तिचे स्वागत घराचे लहान मुले, महिला पूजन करवून करतात. हा आगळावेगळा सोहळा मुरुडच्या किनाऱ्यावर सुरु झाला.
किनारपट्टी भागात मासेमारी या प्रमुख व्यवसायावर समस्त कोळी बांधवांचे जीवन अवलंबून आहे. खोल समुद्रात मासळी पकडून ती मुंबई येथील ससून डॉक येथे विकून तो आपल्या कुटुंबाचे पोषण करतो. कोळी समाज हा भावनिक व श्रद्धाळूसुद्धा आहे. कोकणातील समस्त कोळी समाजाचा आवडता सण म्हणजे होळी. होळी सुरू होण्याअगोदर खोल समुद्रात सापडलेली मासळी मुंबईत विकून आनंदात होड्या आपल्या मायभूमीत येत असतात. सध्या असंख्य होड्या मुरूड तालुक्यातील नांदगाव, राजपुरी, एकदर, आगरदांडा, दिघी येथे येत असून, होळीसाठी मुंबईतून समस्त कोळी बांधव येत आहेत. मुंबईतून निघताना बोटी विविध रंगबिरंगी कापडाच्या झुलीने सजविल्या जातात. विविध फुले, विविध रंगाच्या पताका, रंगबिरंगी झेंडे व कोळी लोक पारंपरिक वेशभूषा परिधान करून खंदेरी येथे वेताळ देवाचे दर्शन घेऊन त्याची पूजा करून येणाऱ्या दिवसात चांगली मासळी मिळावी व समुद्र देवतेपासून आपले सदैव रक्षण व्हावे, अशी वेताळ देवापुढे प्रार्थना करतात.
आनंदाची उधळण
कोळी बांधव होळी हा सण मोठ्या आनंदाने साजरा करीत असतात. आपल्या वर्षभरातील आपापसातील सर्व वैमनस्य विसरून गुण्यागोविंदाने हा सण साजरा करीत असतात. या होळीमध्ये तरुण व वृद्ध स्त्री-पुरुष सर्व उपक्रमांमध्ये आवर्जून सहभागी होतात. विशेष म्हणजे, इतर जातींपेक्षा कोळी समाजाचा होळी सण हा प्रकर्षाने साजरा केल्याचे जाणवते. सर्व दु:ख विसरून आनंद उधळणार हा सण म्हणून समस्त कोळी समाज होळी सणाची दरवर्षी आतुरतेने वाट पाहात असतो.






