मुरूड तालुक्यात बोटी किनार्‍यावर विसावल्या

। मुरूड । वार्ताहर ।

बदलत्या हवामानात सातत्याने होत असलेल्या विपरीत उलटसुलट घडामोडी मासेमारी व्यवसायाच्या जीवावर उठल्या आहेत. ऐन हंगाम असूनही मोठी मासळी मिळणे दुरापास्त झाल्याने पावसाळ्यापुर्वीच मुरूड, एकदरा, राजपुरी खाडीपट्यात अनेक मासेमार व्यावसायिकांनी आपापल्या मासेमारी नौका किनार्‍यावर ओढून शाकारण्यास सुरुवात केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मेरिटाईम बोर्ड विभागाच्या परिपत्रका प्रमाणे पावसाळ्यातील मासेमारी (दि.1) जून ते (दि.31) जुलै पर्यंत बंद राहणार आहे. राजपुरी, एकदरा आणि मुरूड येथील सुमारे 80 यांत्रिक नौका किनार्‍यावर ओढण्याचे काम सुरू असून नौकांतील अंतर्गत डागडुजीची कामे सुरू करण्यात आल्याची माहिती एकदरा गावातील नाखवा रोहन निशानदार आणि राजपुरी येथील जेष्ठ मासेमारी व्यावसायिक धनंजय गिदी यांनी दिली. सध्या छोट्या यांत्रिक नौकांना जेमतेम सफेद कोळीम आणि कोलंबी मिळत असल्याचे निशानदार यांनी स्पष्ट केले. मार्केटमध्ये बाहेरगावाहून आलेल्या मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. कोलंबीची आवक देखील कमी असल्याने कोलंबी सोड्याचे भाव 1800 रुपये किलोवर गेले आहेत. अशा परिस्थिती मुळे अखेर मासेमारी बंद करणे भाग पडल्याचे राजपुरी येथील धनंजय गिदी यांनी स्पष्ट केले. दिवोगणिक मांदेली, कोळीम, कोलंबी, बोंबील सारखी छोटी-छोटी मासळी मिळणे अवघड बनले आहे. कधीतरी अचानक अशी मासळी काही नौकांना मिळत असली तरी मिळण्याची निश्‍चित शाश्‍वती कोणालाच नाही, असे चित्र दिसून आले. समुद्र उशाशी आणि मासेमार उपाशी असे चित्र मुरूड तालुक्यातील किनार्‍यावर दिसून आले आहे. गत वर्षी 1 ऑगस्ट 2023 पासून मासेमारी सुरू झाल्यानंतर या दरम्यान मासेमारी करताना मासेमारांना वाढते तापमान अकस्मात येणारी वादळी परिस्थिती, प्रकल्पाचे दुष्परिणाम, वादळी पाऊस-वारे अशा अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले.

कोलंबी सोडे रु 1800/ प्रति किलो
दिघी, राजपुरी, एकदरा गावच्या कातळावर सुकविलेले कोलंबीचे सोडे पर्यटक आणि मासळी खवय्यांतुन लोकप्रिय आहेत. कोलंबीचे प्रमाण घटल्याने सोड्यांचा भाव देखील वधारला असून प्रति किलो 1800 रुपयांवर गेला आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, ठाणे, नाशिक येथून येत असलेले पर्यटक कोलंबीचे ओरिजिनल सोडे खरेदीसाठी गर्दी करताना दिसून येत आहेत. कोलंबी सोडे चटणी, सोडे बिर्याणी, सोडे फ्राय, कांदा पोहे-सोडे असे विविध मांसाहारी मेनू स्थानिक पातळीवर तयार करूनही दिले जात आहेत. कोळी महिलांनी तयार केलेला मसाला चविष्ठ असून प्रसिद्ध आहे. मुरुडच्या मासळी मार्केटमध्ये सायंकाळी सोडे विक्रीस येत आहेत.
Exit mobile version