कोळी बांधवांचे मल्हार मार्तंडाला गाऱ्हाणं, जाळ्यात भरपूर म्हावरं गाऊंदे!
| मुरुड-जंजिरा | सुधीर नाझरे |
कोळी समाज हा धार्मिक परंपरा जपणारा असून, समुद्रात होड्या लोटण्यापूर्वी मल्हार मार्तंड देवाला कौल लावण्याचा प्रघात आहे. समुद्रात भरपूर मच्छी मिळू दे आणि नुकसान टळू दे’ अशी मनोभावे प्रार्थना केली जाते. तसेच, शुभमुहूर्त काढून पूजाअर्चा करून होड्या समुद्रात सोडल्या जातात. खवळलेल्या समुद्राच्या पाण्याला करंट असल्याने किती नौका निघतील याचे अनुमान लावणे तूर्तास कठीण असले तरी नेमक्याच मोठ्या नौका मुहूर्त काढून मच्छिमारीसाठी जाणार आहेत. परंतु, पूर्वतयारी म्हणून जाळी भरणे, खलाशांची जमवाजमव, डिझेल, बर्फ, अन्नधान्य भरून तयारी काही मच्छिमारांनी चालविली आहे. समुद्रकिनारी जाळी विणणे, होड्यांना तेल पाणी, डागडुजी, रंग लावणे, बोर्ड रंगवणे आदी कामे अंतिम टप्प्यात आहेत.
दोन महिने कमाईविना बैठे असलेले मच्छिमार बांधव 1 ऑगस्टपासून समुद्रात होड्या लोटण्याच्या तयारीत आहेत. होड्यांची डागडुजीसह अन्य बारीक सारीक कामे पूर्ण करण्याच्या कामी मुरुड तालुक्यातील मच्छिमारांची लगबग झाली; परंतु समुद्रात वादळीवाऱ्यासह चार दिवस पाऊस सांगितल्याने कोळी बांधव चिंतेत आहे. सर्वात महत्त्वाचा मासेमारीचा पहिला हंगामाला उशीर होत आहे. देवाकडे समुद्राला शांत होण्याच्या विनंतीसाठी मुरुड कोळीवाड्यात पूजार्चा सुरु आहे.
मुरुड तालुक्यात राजपुरी, एकदरा, मुरुड, मजगाव, दांडा, काशिद, बोर्ली, कोर्लई, साळाव व चोरढे मिळून 750 हून अधिक मासेमारी नौका चालकांनी दोन महिने शासन आदेशाप्रमाणे पूर्णपणे मच्छिमारी बंद ठेवली आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून समुद्रातील हवामान बिघडल्याने तुफान, वादळाचा सामना करताना मत्स्यव्यवसाय आर्थिक नुकसानीत आहे. परिणामी, या व्यवसायातील लोकांना खूपच संघर्ष करावा लागल्याचे चित्र आहे. मत्स्य प्रजनन काळात खोल समुद्रातील मच्छिमारी बंद असल्याने किनाऱ्यालगत जवळा, कोळंबी, बोईटे आदी बारीक मासळीवर उपजीविका होत नसली तरी थोडा फार हात लागत आहे.
मासेमारी बंदी काळात मच्छिमारांनी केलेला खर्च वाया जातो. मायबाप सरकार आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांसाठी मदत करते. अशा स्वरूपात मच्छिमार बांधवांनादेखील अशा परिस्थितीत आर्थिक पॅकेजच्या माध्यमातून मदत करावी.
मनोहर बैले, उपाध्यक्ष, रायगड मच्छिमार संघ