| आगरदांडा | प्रतिनिधी |
पुण्याहून पर्यटनासाठी आलेला 20 वर्षीय युवक तनिष्क मल्होत्रा काशीद बीच येथे मंगळवारी (दि. 1) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पोहताना बुडून बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह आज (दि.3) सकाळी आठ वाजता किनाऱ्या पासून दोन किमी अंतरावर एका खडकावर सापडला.
मंगळवारी तनिष्क बेपत्ता झाल्यावर मुरुड पोलिसांकडून शोध घेण्यासाठी सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेला प्राचारण केले होते. तसेच भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या साह्याने शोध कार्य सुरु केले होते. परंतु, बेपत्ता झालेल्या तनिष्कचा शोध लागला नाही. अखेर रेस्क्यू टीमने पुणे येथून ॲडव्हान्स थर्मल ड्रोन आणून आज सकाळी सात वाजता शोधकार्य चालू केले. अवघ्या 45 मिनिटांमध्ये बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला. मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या स्वाधीन केले. तनिष्क मल्होत्रा हा डिप्लोमा इंजिनिअरिंग च्या शेवटच्या वर्षात शिकत होता अशी माहिती त्याच्या नातेवाईक यांच्याकडून मिळाली. पुढील तपास मुरुड पोलीस करत आहेत.







