मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू
। नागोठणे । प्रतिनिधी ।
नागोठण्यातील ऐतिहासिक जुन्या पुलाजवळील अंबा नदीच्या पात्रात आणि गणपती विसर्जन घाटाजवळ गुरुवारी (दि. 19) दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला आहे. नागोठण्याहून वरवठणे बाजूकडे पुलावरून जाणाऱ्या नागरिकांना हा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. त्यानंतर नागरिकांनी नागोठणे पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रविंद्र पारखे व इतर पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने नदीच्या पात्रातील मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला असता, डॉक्टरांनी मृतदेह तपासून संबंधित व्यक्तीला मृत घोषित केले. मृत व्यक्तीच्या वर्णनानुसार या व्यक्तीचे वय साधारण 45 ते 50 वर्षे असून रंग गहूवर्णीय, उंची सुमारे सुमारे 5 फूट 6 इंच, बांधा मजबूत अंगकाठी असलेला, त्या व्यक्तीचा चेहरा उभट असून केस व दाढी वाढलेली तसेच हाताची बोटे आत वळलेली आहेत. या अज्ञात मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि रविंद्र पारखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेश थाळकर पुढील तपास करीत आहेत.
