पेज नदी पात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातून वाहणाऱ्या पेज नदीच्या पात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून, कर्जत पोलीस त्या व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेत आहे.

कर्जत तालुक्यातील टाकवे गावाच्या हद्दीत पेज नदीत एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. स्थानिक गुराखी यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर कर्जत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्या मृतदेहाची ओळख पटवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मंगळवारी (दि.16) दुपारच्या सुमारास गुरे चारायला गेलेल्या एका स्थानिक व्यक्तीला नदीत झुडपामध्ये एक मृतदेह असल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. मृतदेह पाण्यात झुडपात असल्याने तो बाहेर काढणे अत्यंत कठीण झाले होते. शेवटी कर्जत पोलिसांकडून मृतदेह बाहेर काढण्यासाठी खोपोली येथील हेल्थ फाउंडेशनची मदत घेण्यात आली. हेल्थ फाउंडेशनचे अमोल कदम, अमोल ठगेकर, हनीफ खर्जीकर, निलेश कुदळे, महेश भोसले, विजय भोसले सुमित गुरव हे घटनास्थळी दाखल झाले, त्या रेस्क्यू टीम कडून मृतदेह नदीच्या पाण्याबाहेर काढून तो पोलिसांचे ताब्यात देण्यात आला.

प्राथमिक पाहणीवरून मृतदेह अंदाजे चार ते पाच दिवसांपासून पाण्यात असल्याचे दिसून येत आहे. तसेच मृत व्यक्तीचे वय अंदाजे 40 ते 45 असावे असा अंदाज लावण्यात येत आहे. मृतदेहाची सडलेली अवस्था पाहता, मृत व्यक्तीची ओळख पटवणे सध्या पोलिसांसाठी आव्हान ठरले आहे. मृत व्यक्ती कोण आहे त्याचा मृत्यू कसा आणि का झाला याची सखोल चौकशी आता कर्जत पोलिसांकडून करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेने नागरिक चिंतेत असून, आज्ञात मृतदेहाच्या ओळखीबाबत माहिती असणाऱ्यांनी स्थानिक पोलीस ठाण्याची संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version