। महाड । प्रतिनिधी ।
रानवडी गावाच्या जंगलभागात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत असल्याने या इसमाने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
संदीप पार्टे यांना झाडाला लटकलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. मृतदेह हा वीस ते बावीस दिवसांपूर्वीचा असावा, असा अंदाज असून, तो ओळखण्यापलीकडे आहे. मृताचे वय अंदाजे (50 वर्षे) असावे, असे सांगण्यात आले. मृतदेह पूर्णपणे सडलेला आणि सुकलेला असल्याने घटनास्थळीच मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश गायकवाड हे करीत आहेत.