|नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील पळसदरी येथे असलेल्या मध्य रेल्वेच्या धरणामध्ये दुपारी एका 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह अनोळखी तरुणीचा मृतदेह असल्याने पोलिसांना देखील या घटनेबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.दुसरीकडे त्या तरुणीचा घात की अपघात याबद्दल चर्चेला ऊत आला असून कर्जत पोलिसांनी त्या तरुणीच्या मृत्यूबद्दल अपघात नोंद केली आहे.
पळसदरी येथील मध्य रेल्वेच्या धरणामधील पाणी कोणत्याही कामासाठी वापरले जात नाही. त्यामुळे या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, पाण्याचा वापर केला जात नसल्याने धरण कायम पाण्याने भरलेले असते. या धरणात आज दुपारच्या सुमारास एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती कर्जत पोलिसांना मिळाली. त्यानंतर कर्जत पोलिसांनी खोपोली येथील हेल्प फाउंडेशनला मदतीसाठी पाचारण केले. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठीलकर यांच्यासोबाबत अन्य कार्यकर्ते तेथे पोहचले आणि त्यांनी धरणाच्या पाण्यात उतरून त्या तरुणीचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. सदर तरुणीचा मृतदेह धरणाच्या पाण्यात काही मीटर खोलवर आढळला असून त्या तरुणीचे वय साधारण 25 वर्षे असावे असा अंदाज कर्जत पोलिसांनी वर्तवला आहे. तरुणीचा कदाचित धरणाच्या पाण्यात पाय घसरला असेल किंवा घातपात करून त्या तरुणीचा मृतदेह पाण्यात टाकला असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या धरणाच्या पाण्यात दरवर्षी दोन तीन मृतदेह आढळून येत असतात आणि त्यामुळे कर्जत पोलिसांसाठी या तरुणीचा मृत्यू तपासाचे आव्हान असणार आहे. कर्जत पोलीस ठाणे येथे त्या अनोळखी तरुणीच्या मृत्यूची नोंद आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे.
