श्रीवर्धनमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट


नागरिकांच्या जिवाशी खेळ, आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष
। श्रीवर्धन । वार्ताहर ।

श्रीवर्धन तालुक्यात पुन्हा एकदा बोगस डॉक्टर सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कोणतीही डिग्री नसताना केवळ काही दिवस डॉक्टरकडे कंपाउंडर म्हणून काम केल्यानंतर खेडेगावांमध्ये अशा प्रकारचे डॉक्टर कार्यरत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशा बोगस डॉक्टरांकडून एखाद्या रुग्णाला चुकीचे उपचार मिळाले व त्या रुग्णाचा जीव गमावला तर याला जबाबदार कोण असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. हे बोगस डॉक्टर रुग्णाला इंजेक्शन देण्यापासून ते सलाईन लावण्यापर्यंत सर्व उपचार करत असतात.
तीन ते चार वर्षांपूर्वी वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर आरोग्य प्रशासनाने बोगस डॉक्टरांच्या दवाखान्यावरती छापे टाकले होते. श्रीवर्धन पोलीस ठाण्यात अशा बोगस डॉक्टरांच्या विरोधात गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. ज्या वेळेला बोगस डॉक्टरांच्या दवाखान्यात वरती छापे टाकले होते. त्यावेळी त्या ठिकाणी असलेले सर्व साहित्य बोगस डिग्रीचा बोर्ड, त्याठिकाणी असलेले इंजेक्शन्स व औषधे इत्यादी सर्व मुद्देमाल पुराव्याच्या हेतूने जमा करण्यात आला होता. मात्र मागील तीन-चार वर्षात सार्वजनिक आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांच्या बाबतीत कानाडोळा करण्याचे धोरण अवलंबिले आहे.
ग्रामीण भागातून शहरात गरीब नागरिकांना येणारे परवडत नसते. कारण प्रवासासाठी शंभर रुपये लागतात. त्यानंतर शहरातल्या डॉक्टरची फी, त्यांनी लिहून दिलेली औषधे, गोळ्या याचा खर्च परवडत नसल्याने अनेक गरीब नागरिक अशा बोगस डॉक्टरांचा आधार घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. वास्तविक पाहता तालुक्यात वाळवटी, बागमांडले अशा ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र व शहरात उपजिल्हा रुग्णालय उपलब्ध आहे. तरीसुद्धा ग्रामीण भागातील अनेक रुग्ण या बोगस डॉक्टरांकडून उपचार घेत असल्याचे दिसून येते.

Exit mobile version