माणगावकरांनी पाणी उकळून प्या

| माणगाव | वार्ताहर |
माणगावकर नागरिकांनी सध्याची काळनदीची स्थिती पाहता पाणी उकळून व गाळून प्या असे आवाहन माणगाव नगरपंचायतीचे पाणीपुरवठा सभापती कपिल गायकवाड यांनी केले आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पाणीपुरवठा सभापती गायकवाड यांनी माणगाव नगरपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना विनंती वजा सूचना करताना सांगितले आहे कि, सध्या माणगावात जल शुद्धीकरण केंद्रात तुरटी, टीसीएल पावडरचा योग्य वापर, टाक्यांची साफसफाई योग्य रीतीने करूनही नळाचे पाणी गढूळ रंगाचे येत असल्याचे निदर्शनास येत आहे.

यावर नगरपंचायत लक्ष ठेवून योग्य ती उपाय योजना व खबरदारी घेत आहे. तरी माणगावकर नागरिकांनी पिण्यासाठी पाणी वापरताना ते सध्या उकळून व गाळूनच घ्यावे. कारण जॅकवेल वरूनच हिरवे पिवळसर पाणी शुद्धीकरण केंद्रात येत आहे. प्रक्रिये नंतर पाण्याचा रंग थोडा पिवळसर दिसत असून बायपास राष्ट्रीय महामार्ग नदीवरील पूल बांधकाम सुरु असल्याने दोन्ही बाजूने पाणी मधेच तुंबले आहे. परिणामी त्याचा नैसर्गिक प्रवाह बाधित झाल्याचे प्राथामिक अंदाज आहे यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. तरी माणगावकरांकडून सहकार्याची अपेक्षा नगरपंचायतीने धरून सर्व नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच वापरून काळजी घ्यावी असे आवाहन नगरपंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा सभापती गायकवाड यांनी केले आहे

Exit mobile version