नियमांची पायमल्ली; ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाची कामे
। महाड । प्रतिनिधी ।
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यातील गावांमधून विविध योजना राबवल्या गेल्या आहेत. त्यापैकीच यावर्षी जलजीवन योजना राबवण्यात आली. जवळपास 133 गावांमध्ये या योजनांचा कार्यारंभ झाला असला. तरी आजही अनेक गावातील कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यातच जलजीवन कामांच्या नियमांची पायमल्ली करून निकृष्ट दर्जाची कामे झालेली आहेत. ठेकेदार, अधिकारी आणि लोक्रतिनिधी यांच्या संगनमताने ही कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
महाड आणि पोलादपूर या दोन्ही तालुक्यातील गावे डोंगरदर्यामध्ये वसलेली आहेत. एप्रिल महिन्यानंतर अनेक गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येते. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत मे महिन्याच्या तोंडावर आटत असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येते. यामुळे गेली अनेक वर्षात करोडो रुपयांच्या योजना पाणी टंचाई दूर करण्यासाठी राबवल्या गेल्या असल्या तरी टँकरमुक्त तालुका झालेला नाही. अशा टंचाई ग्रस्त गावांमधून जलजीवन योजना राबवण्याचे शासनाने निश्चित करून जुन्या योजना कार्यान्वित करणे, नवीन योजना राबवणे, अशी कामे हातात घेतली आहेत. महाड तालुक्यामध्ये जवळपास 133 गावांमधून जलजीवनद्वारे कामे मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी फक्त नऊ गावातच ही कामे पूर्ण झालेली आहेत. ठेकेदार आणि ग्रामस्थ यांच्यामधील असमन्वय, तर लोकप्रतिनिधी, ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगनमतामुळे तालुक्यातील जलजीवन योजनांचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट होत आहे.
महाड तालुक्यात या योजनेकरिता करोडो रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गावातील यापूर्वीच्या योजनांचा विचार न करता सत्ताधारी लोकांच्या मर्जीनुसार या कामांचे वाटप झाले आहे. ज्या गावांमध्ये यापूर्वी देखील लाखो रुपयांच्या योजना कार्यान्वयीत आहेत अशा गावात देखील करोडो रुपयाची जलजीवन योजना मंजूर झाली आहे. याबाबत अनेक गावात तक्रारी देखील झाल्या आहेत. मात्र, या तक्रारींकडे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून केराची टोपली दाखवली आहे. यामुळे 133 पैकी विन्हेरे, कोथुर्डे, रावतळी, शिंगर कोंड, राजिवली, किये वाडकर पठार, नडगाव तर्फे तुडील, चांढवे, कडसरी लिंगाणा, या नऊ गावातच हि योजना पूर्ण झाली आहे.
महाड तालुक्यात असलेली पाणी टंचाई दूर करण्यासाठी योग्य नियोजनाची गरज आहे. याकरिता तालुक्यातील प्रलंबित पाणी प्रकल्प पूर्ण झाले तर पाणी टंचाई दूर होईल. महाड तालुक्यातील काळ जलविद्युत प्रकल्पामुळे किल्ले रायगड परिसर, वारंगी ते बिरवाडी, कोंझर ते महाड हा परिसर पाण्याखाली येणार आहेत. विन्हेरे विभागातील आंबिवली धरण, कोथेरी धरण आजही अपूर्णअवस्थेत खितपत पडून आहेत. यामुळे हे प्रकल्प मार्गी लागने काळाची गरज आहे. 2017 मध्ये 12 गावे 109 वाड्या, 2019 मध्ये 25 गावे 117 वाड्या, 2020 मध्ये 12 गावे 82 वाड्या, आणि 2021 मध्ये 30 गावे 133 वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. यावर्षी 13 गावांमधून आणि 114 वाड्यांमधून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.