| कराची | वृत्तसंस्था |
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील एका मशिदीजवळ आत्मघातकी हल्ल्यात झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 52 जण ठार आणि 50 हून अधिक जण जखमी झाले आहेत. प्रेषित मुहम्मद यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलेल्या नागरिकांचा या स्फोटात मृत्यू झाला. मस्तुंग जिल्ह्यातील अल फलाह रोडवरील मदिना मशिदीजवळ हा बॉम्बस्फोट झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मिरवणुकीत कर्तव्यावर हजर असणारे मस्तुंगचे पोलिस उपअधीक्षक नवाज गशकोरी यांचाही मृत्यू झाला आहे. शहर पोलीस अधिकारी मोहम्मद जावेद लेहरी यांनी सांगितले की, मशिदीजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट होता. अज्ञात व्यक्तीने पोलिस उपअधीक्षक यांच्या कारच्या शेजारी बॉम्बस्फोट घडवून आणला. अद्याप, हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही.